रिक्षा चोरल्यावर क्रमांक बदलून त्या भाड्याने चालवण्यास देणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास अटक
By धीरज परब | Published: February 15, 2024 07:56 PM2024-02-15T19:56:48+5:302024-02-15T19:57:06+5:30
भाईंदरच्या राई खाडी पुलावर फिर्यादी रिक्षा चालकाने ३ फेब्रुवारीच्या रात्री त्याची रिक्षा उभी करून तो घरी निघून गेला.
मीरारोड: सार्वजनिक रस्ते आदी ठिकाणी जाणाऱ्या रिक्षा हेरून त्या चोरणाऱ्या व चोरीच्या रिक्षा क्रमांक बदलून ती रिक्षा रिक्षा चालकांना भाड्याने चालवण्यास देणाऱ्या टोळीच्या म्होरक्यास मीरा भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अटक केली आहे. ठाणे, मुंबई, भाईंदर - विरार भागातील चोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणून ९ रिक्षा, २ दुचाकी, मोबाईल असा ६ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
भाईंदरच्या राई खाडी पुलावर फिर्यादी रिक्षा चालकाने ३ फेब्रुवारीच्या रात्री त्याची रिक्षा उभी करून तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची रिक्षा चोरीला गेल्याचे आढळून आले. या प्रकरणी ६ फेब्रुवारी रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांचा विचार करता गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे व सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम , निरीक्षक राहुल राख, सहायक निरीक्षक दत्तात्रय सरक व नितीन बेंद्रे, उपनिरीक्षक हितेंद्र विचारे सह श्रीमंत जेधे, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, सतिश जगताप, आसिम मुल्ला, महेश वेल्हे, संग्राम गायकवाड, अनिल नागरे, हनुमंत सुर्यवंशी, मनोहर तावरे, राजविर संधु, संतोष चव्हाण, मसुब जवान सचिन चौधरी यांचे पथक करत होते.
घडणाऱ्या प्रत्येक वाहन चोरीच्या गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. हवालदार शिवाजी पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, विरार पूर्वेच्या रामु कम्पाऊन्ड, अंबा मदीराच्या मागील बाजुच्या कोप-यात चोरीच्या रिक्षा व मोटार सायकल ठेऊन त्याचे पार्ट वेगवेगळे करुन विकत आहे. सहायक निरीक्षक दत्ताञय सरक व पोलीस पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री करुन सापळा रचला असता एक इसम रिक्षाची छेडछाड करीत असल्याचे दिसले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो अश्रफ ऊर्फ सलमान मंहमद परवेज शेख ( ३२ ) रा . गगनगिरी अपार्टमेन्ट, मकवाना कॉम्प्लेक्स, गोपचरपाडा, विरार पुर्व असल्याचे समजले . त्याच्या कडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता भाईंदरच्या राई येथून त्यानेच रिक्षा चोरल्याचे कबुल केले . अधिक चौकशी मध्ये एकूण ९ रिक्षा व २ मोटर सायकल त्याने व त्याच्या साथीदार सोबत मिळून चोरल्या असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्या कडून चोरी केलेल्या ९ रिक्षा, २ मोटर सायकल व मोबाईल फोन असा ६ लाख ८८ हजारांचा मुददेमाल जप्त केला आहे.
ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाणे हद्दीत ३ , चितळसर पोलीस ठाणे हद्दीत २ , कापूरबावडी तसेच भाईंदर, विरार आणि मुंबईच्या दिंडोशी, चारकोप व एमएचबी पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ असे एकूण ११ गुन्हे केल्याचे उघडकीस आले. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात तो फरार होता.
ह्या टोळीतील म्होरक्या अटक झाला असला तरी त्याचे २ साथीदार आरोपी फरार आहेत . अश्रफ व त्याचे साथीदार हे पार्किंग केलेल्या रिक्षा हेरून ते चोरायचे. ते विरारला न्यायचे . तेथे बोईसर आदी भागातील रिक्षाचा क्रमांक त्यावर लावायचे. चोरीच्या रिक्षा ह्या ते वसई - विरार भागात भाड्याने चालवण्यास द्यायचे. एका पाळीसाठी ते प्रति रिक्षा ३०० रुपये प्रमाणे भाडे घ्यायचे.