गड, किल्ल्यांच्या समस्यांविरोधात महाराष्ट्रातील दुर्गमित्रांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 01:38 AM2018-12-05T01:38:40+5:302018-12-05T01:38:46+5:30
महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले व त्यांची विविध प्रकारची दुरवस्था, त्यावरील गैरप्रकार या विरोधात विविध दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक हे एल्गार पुकारणार आहेत.
वसई : महाराष्ट्रातील गौरवशाली गड किल्ले व त्यांची विविध प्रकारची दुरवस्था, त्यावरील गैरप्रकार या विरोधात विविध दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गमित्र, अभ्यासक, संशोधक, इतिहास संकलक हे एल्गार पुकारणार आहेत. विविध माध्यमातून ते गडसंवर्धनासाठी सातत्याने श्रमदान मोहिमा राबवून झटत आहेत. सध्या गडकिल्यांवर कायमस्वरूपी दारूबंदी, प्रेमी युगलांचे अश्लील चाळे रोखणे प्रि-वेडिंग, अश्लील छायाचित्रे काढणे थांबविणे यासाठी आंदोलन केले जाणार आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारात तपासणी केंद्रांचा अभाव, रात्री अपरात्री किल्ल्यात होणारे गैरप्रकार इत्यादी प्रश्नांवर पुरातत्व विभाग निव्वळ मौन पाळून आहे. यावर ठोस उपाययोजना करावी. या मागणीसाठी समस्त महाराष्ट्रातील दुर्गमित्रांकडून या आंदोलनाचे शस्त्र उगारण्यात येणार आहे.
दुर्गमित्रांनी महाराष्ट्रातील गडकोटांच्या समस्येबाबत विभागवार दिलेल्या निवेदने व विनंतीपत्रे यावर केंद्रीय पुरातत्व विभागाने कोणतीही कारवाई आजपर्यंत केलेली नाही. गडकोटांवर सुरू असलेले गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थिती यावर ठोस उपाययोजना करावी या एकमेव मागणीने समस्त महाराष्ट्रातील दुर्गमित्र एकत्र येऊन वसई किल्ल्यावर १५ व १६ डिसेंबर म्हणजेच शनिवार व रविवारी एल्गार आंदोलन करणार आहेत.
दोन्ही दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत समस्त दुर्गमित्र, अभ्यासक केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वसई किल्ल्यातील कार्यालयासमोर बसून आपल्या मागण्या, निवेदने, प्रतिक्रिया, विनंती पत्रके इत्यादी बाबी मांडणार आहेत.
नाशिक, मुंबई, भाईदर, शिरगाव, माहीम, पुणे येथून या आंदोलनासाठी समस्त दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी सहभाग नोंदवून आपले जाहीर म्हणणे मांडणार आहेत. त्यातून काय निष्पन्न होते? याकडे सर्व दुर्गप्रेमींचे लक्ष लागले आहे.
.कर्मचारी साधतात स्वार्थ
सध्या विविध किल्ल्यातील अनेक कर्मचारी वर्ग प्रेमीयुगलांकडून, छायाचित्रकारांकडून अनधिकृत आर्थिक स्वार्थ साधत असल्याचे सातत्याने समोर येत आहेत.गडकिल्यांच्या वाढत्या समस्या व प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दुर्गमित्रांनी आरंभिलेले हे आंदोलन अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. त्याच्या फलनिष्पत्तीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.