वय वर्ष ४४, मात्र वाढदिवस १२ वा, करावी लागते चार वर्ष प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 12:35 AM2020-03-01T00:35:17+5:302020-03-01T00:35:25+5:30
२९ फेब्रुवारीला जन्म झालेल्यांना आणि त्यांच्या आप्तेष्टांकरिता आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे.
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी : २९ फेब्रुवारीला जन्म झालेल्यांना आणि त्यांच्या आप्तेष्टांकरिता आजचा दिवस खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे ४४ वर्षीय शैलेश गोंधळेकर (रा. चिखले) यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याकरिता डेस्टिनेशन सेलिब्रेशनचे आयोजन करून १२ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शैलेशसारख्या अनेकांकरिता हा दिवस खास होता.
२९ फेब्रुवारी ही तारीख दर चार वर्षांनी येत असल्याने हे लीपवर्ष सर्वांच्या लक्षात राहते. या दिवशी ज्यांचा जन्म होतो, त्यांना मात्र प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करता येत नसल्याने त्यांच्याकरिता हा दिवस सोहळाच असतो. त्यामुळे त्यांचे वय आणि त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी मिळालेले वर्ष यांचे प्रमाण खूपच कमी असते.
या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतो. आपल्या आयुष्यातील काही आठवणी हटके करण्याची इच्छा अनेकांमध्ये दिसून येते. त्यातूनच आजच्या दिवशी वास्तुशांत, नवीन गाडी खरेदी आणि लग्न सोहळा उरकून घेण्याचे आयोजन केले जाते.
आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्याने सिझेरियन पद्धतीने प्रसूती करणे शक्य झाले आहे. तथापि काही दाम्पत्यांकडून या दिवसाला प्राधान्य दिला जातो.
>४४ वर्षीय शैलेश गोंधळेकर यांचा १२ वा वाढदिवस त्यांच्या कुटुंबीयांनी डेस्टिनेशन सेलिब्रेशनद्वारे साजरा केला.