सर्पदंश झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी अघोरी उपचार! पालघरमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 01:47 PM2023-08-09T13:47:45+5:302023-08-09T13:49:04+5:30
तलासरी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .
हितेन नाईक
पालघर- आपला देश एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय तर दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई पासून १००किमी अंतरावरील पालघर जिल्ह्यात आजही अंधश्रद्धेचा मोठा पगडा पाहायला मिळतोय. अंधश्रद्धा विरोधी कायदा संमत होऊनही अजूनही पालघर जिल्ह्याच्या आदिवासी बहुल भागात बुवा बाजीची खोलवर रुजलेली पाळेमुळे कमी होताना दिसत नाहीत. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे.
तलासरी ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका इसमावर अंधश्रद्धेतून चक्क रुग्णालयातच अघोरी विद्या सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार असून या घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर समोर आला आहे . तलासरी तालुक्यातील करजगाव येथील सोन्या लाडक्या ठाकरे यांना सर्पदंश झाला. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्याला तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं .
मात्र या रुग्णालयातच एका मांत्रिकाने त्यांच्यावर अंधश्रद्धेतून अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला . यानंतर काही वेळातच सोमा ठाकरे यांची प्रकृती आणखीन बिघडली असून त्यांना सध्या दादरा नगर हवेलीतील सेलवासा येथील विनोबा भावे रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. थेट रुग्णालयातच अशा पद्धतीने अंधश्रद्धेतून अघोरी विद्येचा प्रयोग झाल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
सर्पदंश झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी अघोरी उपचार! पालघरमधील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल#videopic.twitter.com/rbXBV32uiN
— Lokmat (@lokmat) August 9, 2023