पाण्यासाठी रणरागिणींचा हंडामोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:38 PM2020-02-10T22:38:23+5:302020-02-10T22:39:31+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : डोक्यावर रिकामे हंडे घेऊन असंख्य महिला मोर्चात सहभागी

agitation for water by womens | पाण्यासाठी रणरागिणींचा हंडामोर्चा!

पाण्यासाठी रणरागिणींचा हंडामोर्चा!

Next

पालघर : ‘आमचे पाणी आम्हाला, देणार नाही सिन्नरला, पाणी आमचे हक्काचे, लढून आता मिळवायचे’ अशा घोषणा देत मोखाड्यातील रणरागिणी डोक्यावर रिकामा हंडा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ अशी गर्जना करीत शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. आमचे घसे कोरडे ठेवून आमचे पाणी सिन्नरला नेण्याचे शासकीय धोरण तत्काळ रद्द करण्याची मागणी या वेळी महिलांनी केली.


मोखाडा तालुक्यातील जनतेची सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणीटंचाई, पाच वर्षांपूर्वीपासून या समस्येवर कष्टकरी संघटनेने काही ठोस पर्याय सुचविले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये जिल्ह्याला दिलेल्या भेटीदरम्यान मोखाडा-जव्हार या दोन तालुक्याची पाणी टंचाई समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केली होती. त्यानुसार कृती योजना आखण्यासाठी व त्याची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येत सर्वेक्षणही झाले होते. त्याचे आराखडे तयार करण्यात आले. अंमलबजावणी कशी करायची हेही स्पष्ट झाले. पण गेल्या एक वर्षापासून याकडे कानाडोळा केला जात आहे. मागील सहा महिन्यापासून मोखाडाच्या पाणीटंचाईची समस्या मार्गी लावण्यासाठी कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो आणि त्यांची टीम सातत्याने प्रयत्न करत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, मात्र जिल्हा प्रशासनाकडून पाणी प्रश्न सुटण्याबाबत योग्य कार्यवाही केली जात नसल्याचे कष्टकरी संघटनेचे म्हणणे आहे.


मोखाडा तालुक्यात मोजक्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरीही त्यांचा स्रोत हा विहिरीतल्या पाण्याच्या साठ्यावर असल्याने त्याही उन्हाळ्यात बंद पडतात. डोंगराळ भाग आणि मातीच्या गुणवत्तेमुळे २३४० मिमी एवढा पाऊस पडूनही हे पाणी जमिनीत न मुरता वाहून जाते. त्यामुळे विहिरींचे पाणी हे मोखाड्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय नक्कीच नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.


प्रमुख मागण्या

अप्पर वैतरणा सामूहिक पाणीपुरवठा योजना मंजूर करा.
दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प रद्द करा.
मोखाडा तालुक्यासाठी पर्यायी
जल आराखडा तयार करा.
अस्तित्वात असलेल्या धरणांच्या (वाघ, खोच तुळ्याचापाडा, सायदे) पाण्याचे नियोजन करा.

मोखाडातील बहुतांश पाडे पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींवर अवलंबून आहेत. मार्च-एप्रिल महिना येताच विहीर-बावडी आटायला सुरुवात होऊन पाणीटंचाई भासू लागते.

Web Title: agitation for water by womens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.