मरणानंतरही भोगाव्या लागतात यातना; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:41 PM2020-02-24T22:41:35+5:302020-02-24T22:41:38+5:30

पेल्हार येथील स्मशानभूमीची दुरवस्था

The agony of suffering after death; Warning of citizens' agitation | मरणानंतरही भोगाव्या लागतात यातना; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

मरणानंतरही भोगाव्या लागतात यातना; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Next

- मंगेश कराळे 

नालासोपारा : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मृतदेहांना यातना भोगाव्या लागत असून अंत्यविधीसाठी येणारे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच रहिवाशांना येथे अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागते आहे. पेल्हार गावातील वनोठा पाडा येथील स्मशानभूमी शेवटच्या घटका मोजत असल्याचे दिसते आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, बसण्यासाठी जागा नाही, पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांचे दरवाजे गायब, शेजारी असलेले घाणेरडे पाणी, दिवाबत्तीची सोयही नाही, स्मशानभूमीत कोणीही सरकारी कर्मचारी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना स्वत: लाकडे रचावी लागतात, अशा अनेक समस्या येथील नागरिकांना भेडसावत आहेत. स्मशानभूमीच्या भिंतीच्या प्लास्टरमधील गंजलेल्या लोखंडी सळ्या, खाली पडत असलेले प्लास्टर आणि धोकादायक अवस्थेतील भिंतीमुळे एखादी जीवघेणी दुर्घटनाही येथे घडू शकते.

या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी गडग्याचा पाडा, इंदिरा वसाहत, वाकणपाडा, पेल्हार, वनोठा पाडा, वसई फाटा, अवधूत आश्रम, डोंगरीपाडा या भागातील नागरिक येतात. वॉर्ड नंबर १ आणि वॉर्ड नंबर ४३ या दोन्ही वॉर्डच्या सीमेवर ही स्मशानभूमी असल्याने दोन्ही नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. परिसरात अंदाजे १० ते ११ हजार मतदार असून त्यांना सुविधा मिळत नसल्याने स्मशानभूमीची डागडुजी केली नाही तर आगामी मनपा निवडणुकीत बहिष्कार टाकणार असल्याचे स्थानिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंगळवारी किंवा बुधवारी गावकरी आणि साई गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते चंदनसार मनपा कार्यालयात जाऊन याबाबत विचारणा करून सहा. आयुक्तांना निवेदन देणार आहेत. या स्मशानभूमीची व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी देणार आहे. तरीही यात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा पवित्रा घेणार आहे.

धोकादायक छताखाली अंत्यसंस्कार...
महानगरपालिकेअंतर्गत स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना इतकी भीती वाटते.
त्याचबरोबर संरक्षक भिंतीना मोठ्या भेगा पडल्या असून आसन व्यवस्था असलेली भिंत कोसळलेली आहे. बाथरूमचे तिन्ही दरवाजे गायब असून त्याच्याही भिंतीना तडे गेले आहेत. वीजेचा खांबही वाकलेला आहे.

मेल्यानंतरही लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. अनेक वर्षांपासून हा त्रास असून दोन्ही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. मनपाचा कोणीही कर्मचारी येथे हजर नसतो.
- राजू दास (गावकरी)

मंगळवारी किंवा बुधवारी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह गावकरी मोठ्या संख्येने चंदनसार कार्यालयात जाऊन निवेदन देणार आहे. तरीही मनपाने डागडुजी केली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. - अंकित तिवारी
(गावकरी, अध्यक्ष, साई गणेश मित्र मंडळ, पेल्हार)

ही स्मशानभूमी कुठे आहे याची माहिती घेतो आणि तिची दुरवस्था झाली असेल तर तिची लवकरात लवकर डागडुजी करण्यात येईल.
- राजेंद्र लाड (सार्वजनिक बांधकाम अभियंता, वसई विरार महानगरपालिका)

Web Title: The agony of suffering after death; Warning of citizens' agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.