मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला शिवशाहीचा वातानुकूलित धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 03:48 PM2018-02-15T15:48:55+5:302018-02-15T15:49:14+5:30
महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका
भार्इंदर : महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळाने वातानुकूलित शिवशाही बस भार्इंदर ते ठाणे मार्गावर माफक दरात नुकतीच सुरु केल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेला त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.
पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाकडुन या मार्गावर एकुण सहा बस चालविल्या जातात. त्यापैकी ४ बस भार्इंदर (प) तर २ बस मीरारोड पुर्व रेल्वे स्थानक परिसरातून सोडल्या जातात. भार्इंदर (प) ते ठाणे (कोपरी) दरम्यान साधारण व वातानुकूलित प्रत्येकी २ बस तर मीरारोड येथून २ वातानुकूलित बस सोडल्या जातात. यातील साधारण बसचे कोपरी पर्यंतचे भाडे प्रत्येकी ३० रुपये तर वातानुकूलित बसचे प्रवासी भाडे प्रत्येकी १०० रुपये आहे. भार्इंदर येथून सकाळी ६.४० ते सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान साधारण बस सोडल्या जातात. तर वातानुकूलित बसची सेवा सकाळी ७.५० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान सुरु ठेवली जाते. मीरारोडहुन वातानुकूलित बस सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सेवा देतात. दोन बसच्या सेवेतील अंतर अर्धा तासाचे असले तरी या मार्गावर सुमारे १ हजार २०० ते दिड हजार प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. यातून परिवहन विभागाला दिवसामागे सुमारे ६५ हजार रुपयांहून अधिक उत्पन्न प्राप्त होत असल्याने ते इतर मार्गाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. या मार्गावर इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेद्वारे दिवसाला १० ते १५ हजार प्रवासी दररोज प्रवास करीत असल्याने हा मार्ग सार्वजनिक वाहतुक विभागांसाठी फायदेशीर मानला जातो. हा फायदा गृहित धरुन एसटीने दोन दिवसांपासुन भार्इंदर पश्चिम बस स्थानकातून १२ शिवशाही वातानुकूलित बस सुरु केल्या आहेत. या बसची सेवा भार्इंदर (प) ते ठाणे पश्चिम पर्यंत विनावाहक असल्याने या मार्गादरम्यानच्या प्रवाशांना मात्र त्यातून प्रवास करता येत नाही. या बसची सेवा सकाळी ७.५० ते रात्री १२.३० पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली असुन त्याचे प्रवासी भाडे देखील ४८ रुपये एवढे माफक ठेवण्यात आले आहे. या बसची सेवा थेट असल्याने बसस्थानकातून निघणाऱ्या बसची विनाथांबा जलद सेवा प्रवाशांना भुरळ पाडू लागल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाच्या वातानुकूलित सेवेवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासुन त्याचा परिणाम अद्याप स्थानिक परिवहनच्या वातानुकूलित सेवेवर झाला नसल्याचे विभागाकडुन सांगण्यात येत असले तरी भविष्यात मात्र तो होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे स्थानिक परिवहन सेवेच्या बसमधून प्रवाशांना शिवशाहीकडे वळण्यापासुन रोखण्यासह परिवहन विभागाचे उत्पन्न कायम ठेवण्यासाठी प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडुन प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे मत विभागातील कर्मचाऱ्यांकडुन व्यक्त केले जात आहे.
एसटीच्या शिवशाहीची स्पर्धा करुन स्थानिक परिवहन सेवा ठाणे मार्गावर भरीव उत्पन्नावर कशी सुरु ठेवता येईल. तसेच हि सेवा पर्यायी व फायदेशीर ठरणाऱ्या मार्गावर वळविण्याबाबत स्थानिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे.