सर्वेक्षणानंतर हवेची गुणवत्ता सुधारली? तारापूर एमआयडीसीतील उद्योगांत कारवाईची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:38 AM2020-12-11T00:38:18+5:302020-12-11T00:40:39+5:30
Tarapur MIDC News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत तारापूर एमआयडीसीतील उद्योगांची पर्यावरणाच्या संदर्भात तपासणी (सर्वेक्षण) सुरू करताच तारापूरच्या हवेच्या गुणवत्तेत हळूहळू काहीशी सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे.
- पंकज राऊत
बोईसर - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांच्या विशेष पथकामार्फत तारापूर एमआयडीसीतील उद्योगांची पर्यावरणाच्या संदर्भात तपासणी (सर्वेक्षण) सुरू करताच तारापूरच्या हवेच्या गुणवत्तेत हळूहळू काहीशी सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे. आम्हाला चांगली, दुर्गंधी आणि वासविरहित शुद्ध हवा मिळण्यासाठी हे असे सर्वेक्षण कायमस्वरूपी सुरू ठेवावे, अशी मागणी आता येथील नागरिक करू लागले आहेत.
तारापूरच्या हवा आणि जलप्रदूषणात प्रचंड वाढ झालेली असून यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवत आहेत. मात्र सध्या सर्वेक्षण सुरू असून यादरम्यान प्रदूषण कमी होऊन हवेत सुधारणा होत आहे. तारापूर येथील तपासणी झालेल्या उद्योगांमधील सांडपाणी आणि हवेच्या नमुन्यांचे प्रयोगशाळेत पृथ्थकरण करून पर्यावरणाच्या मापदंडकानुसार पडताळणी होणार असून तपासणीत जे दोषी आढळतील त्या उद्योगांवर कारवाई करण्यात येणार आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर तसेच खंबीर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
९ डिसेंबरपर्यंत १९१ उद्योगांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कारवाईच्या भीतीपोटी उद्योगांमध्ये पर्यावरणाच्या नियमांची अंमलबजावणी होत असल्याने हवेत सुधारणा होत आहे. मात्र प्रत्येक उद्योगाला म.प्र. नि.मंडळाने दिलेल्या अटी व शर्तींबरोबरच उत्पादन व इतर सामग्रीचा खर्च वाचविण्यासाठी दिलेले नियम पायदळी तुडवत असल्याचे निदर्शनास येणाऱ्या उद्योगांवर कारवाई होणार आहे. तसेच सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी व आता यादरम्यान हवेत किती सुधारणा झाली याचा अहवालही राष्ट्रीय हरित लवादाकडे सुपूर्द केल्यास खरे चित्र समोर येईल.
माहिती देणारा फलक धूळ खात
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाच्या इमारतीवर हवेची गुणवत्ता तापसणाऱ्या स्टेशनमधील अद्ययावत तंत्राद्वारे पीएम २.५(हवेतील तरंगणारे धूलिकण पीएम २.५ मायक्रोन), पीएम १० (हवेतील तरंगणारे धूलिकण १० मायक्रॉन), सीओ (कार्बन मोनोऑक्साईड ), एस ओ २ (नायट्रोजन डाय ओक्सईड), एस ओ २ (सल्फर डायोक्ससाईड) इत्यादींचे प्रमाण मोजून हवेची गुणवत्ता तपासून त्याची माहिती कार्यालयाबाहेरील फलकावर लिहिण्यात येत होती. दुर्दैवाने तो फलक आज धूळखात पडला आहे.
सध्या म.प्र.मंडळाच्या अधिकाऱ्यांचे विशेष पथक तारापूर औद्योगिक क्षेत्रात सर्वेक्षण करीत आहे. तसेच कुठलाही अधिकारी कधीही उद्योगास भेट देऊ शकतो ही भीती असावी यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली आहे.
- डॉ. राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी,
म.प्र.नि. मंडळ, ठाणे विभाग.
तारापूर एमआयडीसीतील वातावरण काहीसे सुधारलेले जाणवत आहे. घाण वास कमी झाला आहे. फक्त सर्वेक्षणदरम्यान सुधारणा नको, तर ती कायमस्वरूपी असावी.
- डॉ. सूर्यकांत संखे, अध्यक्ष, सिटिझन्स फोरम बोईसर.