गॅसचा टँकर नदीत कोसळून वायुगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:34 PM2019-05-24T23:34:43+5:302019-05-24T23:34:47+5:30

रायते पुलावरील घटना : चालक जखमी; वायुगळती थांबवण्यात आले यश

Air tanker in the river collapses into the river | गॅसचा टँकर नदीत कोसळून वायुगळती

गॅसचा टँकर नदीत कोसळून वायुगळती

googlenewsNext

टिटवाळा / म्हारळ : कल्याण-मुरबाड महामार्गावरील रायते पुलावरून एलपीजीने भरलेला टँकर बुधवारी मध्यरात्री उल्हास नदीत कोसळून वायुगळती झाली. पहाटे ही वायुगळती थांबवण्यात यश आले. अपघातात टँकरचालक जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मुंबईतील चेंबूरहून मुरबाडकडे हा एलपीजी गॅसचा टॅँकर जात होता. रायते पुलाजवळ असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे लोखंडी रेलिंग तोडून हा टॅँकर ४० फूट खाली नदीत कोसळला. याबाबत टिटवाळा येथील युवक तुषार गिरीराज याने तत्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.


या अपघातात चालक तेरसू यादव हा जखमी झाला आहे. त्याला प्रथम गोवेली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उल्हास नगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, टॅँकरमधील एलपीजीची पाण्यात गळती झाल्याने पोलिसांनी हा रस्ता बंद केला. तसेच तेथे जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर, अग्निशमन दल आणि गॅस कंपनीच्या वायू नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमोद कोलते यांच्यासह आर. मायकल आणि रितेश कुमार यांनी नदीत उतरून वायुगळती तात्पुरती बंद केली. हा टॅँकर नदीत कोसळल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अहिरराव यांनी सांगितले. दरम्यान, एलपीजी गॅस पाण्यावर तरंगत असल्याने टिटवाळा पोलिसांनी हा परिसर बंद केला. टँकरमध्ये ३६ हजार लीटर एलपीजी गॅस आहे. हा गॅस दुसऱ्या टॅँकरमध्ये साठवण्यात येणार आहे, असे वायुगळती नियंत्रण पथकाच्या आर. मायकल यांनी सांगितले. घटनास्थळी पोलीस पथक तैनात असून गॅसमुळे कुणाला त्रास होत आहे का, याचीही माहिती घेण्यात येत आहे.

गॅस टॅँकर नदीत कोसळल्याची माहिती मिळताच मध्यरात्री २ वाजता त्वरित घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच वायुगळतीवर नियंत्रण आणले. - प्रमोद कोलते,
अग्निशमन अधिकारी, कल्याण

Web Title: Air tanker in the river collapses into the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.