धामणीचे सर्व दरवाजे उघडले, उन्हाळी सिंचनाचीही झाली सोय, बळीराजा सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:52 AM2017-08-29T01:52:10+5:302017-08-29T01:52:31+5:30
सूर्या प्रकल्पांतर्गत असलेले धामणी धरण ओसंडून वाहू लागले असून धरणाच्या पाच गेट मधून ४ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येत असून धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे तो अधिक होण्याची शक्यता अधीक्षक अभियंता निलेश दुसाने यांनी व्यक्त केली आहे.
पालघर/कासा : सूर्या प्रकल्पांतर्गत असलेले धामणी धरण ओसंडून वाहू लागले असून धरणाच्या पाच गेट मधून ४ हजार २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सूर्या नदी द्वारे करण्यात येत असून धरण क्षेत्रात पडणा-या पावसामुळे तो अधिक होण्याची शक्यता अधीक्षक अभियंता निलेश दुसाने यांनी व्यक्त केली आहे.
पालघर जिल्ह्यात सर्वच भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून सकाळ पासून पावसाची रीपरिप सुरुच आहे. त्यामुळे पालघर, डहाणू तालुक्यासह विक्रमगड तालुक्यातील काही भागांना पाणीपुरवठा करणारे हे धरण आज पूर्ण भरले. या धरणाची क्षमता २८६ द.ल.घ.मी असून १ जून पासून ह्या धरण क्षेत्रात ३ हजार २४४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी ही ह्याच कालावधीत हे धरण भरले होते.
पालघर तालुक्यातील २६ गावे नळ पाणीपुरवठा योजना, बोईसर एमआयडीसी, टी ए पी एस कॉलनी, डहाणू तील बाडापोखरण, थर्मल पॉवर, वसई-विरार, भार्इंदर या शहराला धामणी धरणातून सूर्या नदीद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या शहरांचा पाण्याचा व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.
आज या धरणाचे ३ दरवाजे १ फुटाने तर २ दरवाजे अर्ध्या फूटाने उघडण्यात आले आहेत. गरज भासल्यास ते अधिक उंचीने उघडले जातील. अशी माहिती त्यांनी दिली.
सध्या ४२०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत करण्यात येत असून सध्याची पावसाची रिपरिप सुरु च राहिली तर पाण्याचा विसर्ग अधिक वाढविला जाऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले. कवडास धरणही ओसंडून वहात असून त्या धरणाचे सूर्या नदीत सोडण्यात आले आहे. या नदीवर नवा उंच पूल बांधण्यात आल्याने यंदा प्रतिवर्षीप्रमाणे असा विसर्ग होताच मासवण पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद पडण्याची पाळी आता येणार नाही. कारण पूर्वीचा ठेंगणा पूल पाण्याखाली गेला तरी नव्या पूलावरून वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.