मासेमारी बंदी होताच सर्वप्रकारची मच्छी झाली महाग; खवैय्ये झाले नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 11:33 PM2019-06-01T23:33:54+5:302019-06-01T23:34:07+5:30
उष्णतेमुळे चिकन आणि अंडी याच्या खपात एकीकडे घट झाली असतांनाच दुसरीकडे मच्छीमारीची बंदी जारी झाली आहे.
हितेन नाईक
पालघर : 1 जून पासून मासेमारी बंदी कालावधीला सुरुवात झाल्याने बाजारातील पापलेट, बोंबील, कोळंबी आदी माशांची आवक घटली असून माच्छीच्या दराने उचल खाल्ली आहे.
१ जून ते ३१ जुलै अशी शासनाने ६१ दिवसांचा मासेमारीबंदी कालावधी घोषित केल्याने समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे. जिल्ह्यात वसई, पालघर आणि डहाणू ह्या तीन तालुक्यातील सुमारे ३ ते ४ हजार बोटी द्वारे मासेमारी केली जात असून पापलेट, दाढा, घोळ, कोळंबी, शेवंड आदी मासे निर्यात केले जातात. तर उर्वरीत मध्यम पापलेट, रावस, बोंबील, सुरमई, कोत, करकरा, कोळंबी, मांदेली, आदीमासे विक्रीसाठी बाजारात येत असल्याने सुमारे १० महिने खाद्यप्रेमींना ताजे आणि रुचकर मासे स्वस्त आणि माफक दरात उपलब्ध होत असतात. त्यामुळे मासळी मार्केट सह शहरातील रस्त्या रस्त्यावर मासे विक्रेत्या महिला मासे विक्री करीत असल्याने जिल्ह्यात सहज मासे उपलब्ध होत असतात.
शनिवार पासून मासेमारी बंदी कालावधीला सुरु वात झाल्यामुळे रस्त्या रस्त्यावर दिसणाऱ्या कोळी महिला दिसेनाशा झाल्या असून बाजारात शितगृहात साठवणूक केलेले मासे विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. गरिबांचे अन्न म्हणून ओळखला जाणारा बोंबील कोळी महिलांच्या फळी वरून गायब झाला असून त्याची जागा खाडीतील माशानी घेतली आहे. सुपर क्वालिटीचा १६०० रुपये प्रतिकिलो ने मिळणारा पापलेट १८०० रुपये, १ नंबर १५००, २ नंबर १३००, ३ नंबर आणि ४ नंबर १००० रुपये इतक्या चढ्या भावाने सध्या मासे मिळत आहेत. तर ८०० रु पये प्रति किलो ने मिळणारी घोळ ११०० रु पये किलो, दाढा १२००, सुरमई १०००, बोंबील १५० रुपयाचा वाटा, कोळंबी ६०० किलो, करकरा १ हजार रुपये किलो, अशा चढ्या दराने सध्या विक्री होत आहे. त्यामुळे खवय्यांच्या ताटात माशांची जागा चिकन, मटण किंवा खाडीतील बोय, निवटी, कोलबट, शिंपले आदीं मासे घेणार आहेत.
उष्णतेमुळे चिकन आणि अंडी याच्या खपात एकीकडे घट झाली असतांनाच दुसरीकडे मच्छीमारीची बंदी जारी झाली आहे. याचा परिणाम मटणाची मागणी आणि भाव वाढण्यात झाला आहे. अजुनपर्यंत हॉटेलमधील दर वाढले नसले तरी ते एक ते दोन दिवसांत वाढण्याची दाट शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी लोकमतशी बोलतांना बोलून दाखविली आहे.