सीओंसाठीच्या उपोषणाकडे सगळ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:03 AM2017-07-20T04:03:33+5:302017-07-20T04:03:33+5:30
जानेवारीपासून अस्तित्वात आलेल्या या नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने तो तातडीने नेमावा यासाठी नगराध्यक्षांसह
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड: जानेवारीपासून अस्तित्वात आलेल्या या नगरपंचायतीमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुख्याधिकारी नसल्याने तो तातडीने नेमावा यासाठी नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी आरंभिलेल्या उपोषणाकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने ते बुधवारी म्हणजे दुसऱ्या दिवशीही सुरूच होते.
पहिल्या दिवशी बांधकाम विभागाचे अधिकारी होले यांनी मिटींंगला जाण्याचा बहाणा करुन पळ काढला़ विक्रमगड हा आपला मतदारसंघ असतांनाही आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचाच कित्ता गिरवून जिल्हा प्रशासनानेही त्याची दखल न घेण्यात धन्यता मानली आहे.
पालकमंत्र्यांनी भेट घेतली नाहीच. साधा फोन करुनही उपोषण कर्त्यांची चौकशी केलेली नाही़ मंत्री या नात्याने राजकारण बाजुला ठेऊन हा प्रश्न सोडविणे आवश्यक असतांनाही येथील मतदारांनी त्यांच्या पक्षाला या नगरपंचायतीची सत्ता दिली नाही याचा राग मनात ठेवून त्यांनी या नगरपंचायतीला मुख्याधिकारी लाभू दिलेला नाही. असा आरोप निलेश सांबरे यांनी यावेळी केला़ तर यामध्ये अधिका-यांना वेठीस धरले जात असल्याने ते ही यामध्ये दुर्लक्ष करीत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे़
पहिल्या व दुस-या दोन्ही दिवशी तहसिलदार सुरेश सोनवणे यांनी उपषेणकर्त्यांची भेट घेतली. मात्र हा विषय माझ्या अखत्यारीमधील नसून सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविता येईल असे सांगितले.
मात्र पालकमंत्री, अगर जिल्हाधिकारी वा त्यांचा कुणी प्रतिनिधी येथे चर्चासाठी आलेले नाहीत त्यामुळे उपोषणकर्ते नगराध्यक्ष रविंद्र खुताडे यांनी व त्यांच्या समर्थकांनी हे उपोषण सुरुच ठेवले आहे़
मात्र मुख्याधिकारी नसल्याने विद्यार्थ्यांना दाखले देणे, येथील रहीवाशांची घरपटटी घेणे, घरे, सदनिका नावे करणे अतिक्रमणे हटविणे आदींबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे़
बुधवारी उपोषणाचा दुसरा दिवस असूनही आदिवासी विकास मंत्र्यांनी साधी चौकशीही केली नाही त्यामुळे जो पर्यत मुख्याधिकारी मिळकत नाही तो पर्यत हे उपोषण सुरुच राहील भले शहराच्या विकासासाठी या उपोषणामध्ये माझा जीव गेला तरी मला त्याची पर्वा नाही़
-रविंद्र खुताडे, नगरध्यक्ष, विक्रमगड
विक्रमगडच्या नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांनी सत्ता आमच्या विकास आघाडीच्या हाती दिली तिने कमी कालावधीत विकास कामांचा धडाका लावला हे विरोधकांना रुचले नाही व त्यांनी असलेला मुख्याधिकारी पळवून लावून हे पद रिक्त ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत हा गावाच्या विकासात घातलेला खोडा आहे. हे शहरवासीयांनी लक्षात ठेवावे.
- निलेश सांबरे, सत्ताधारी विकास आघाडीचे प्रमुख