रथी-महारथींनी ठोकला तळ, सर्वच पक्षांनी कंबर कसली, डहाणू न.प.साठीचा प्रचार अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:17 AM2017-12-15T02:17:44+5:302017-12-15T02:17:52+5:30
येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बविआ, काँग्रेस या सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रचार अंतिम टप्यावर येऊन पोचल्याने सर्वच पक्षांनी थेट प्रचारवर भर दिला आहे.
डहाणू : येथील नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बविआ, काँग्रेस या सर्वच पक्षांनी कंबर कसली असून प्रचार अंतिम टप्यावर येऊन पोचल्याने सर्वच पक्षांनी थेट प्रचारवर भर दिला आहे. भाजपकडून भरत राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिहीर शहा, शिवसेनेकडून संतोष शेट्टी, बविआ कडून दिलीप वळवी अपक्ष डॉ. अमित नाहर निवडणुक लढवत आहे. यासाठी भाजपकडून खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे तर शिवसेनेकडून संपर्क प्रमुख आ. रविंद्र फाटक, आ.अमित घोडा, राष्ट्रवादीचे आ. आनंद ठाकूर यांनी तळ ठोकला आहे.
गुरु वारी भाजपने डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. यावेळी भाजपच्या रॅलीमध्ये पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, जिल्हाध्यक्ष आ.पास्कल धनारे यांनी उपस्थित राहून भाजपला बळ दिले आहे तर राष्ट्रवादीने चौका चौकांमध्ये उमेद्वारांचा प्रचार सुरु केला आहे. १६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार थांबत आहे. १७ डिसेंबर रोजी होत असलेल्या मतदानाद्वारे नगराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याबाबत शहरामध्ये उत्सूक्ता आहे.
जव्हारमध्ये ईव्हिएम मशीनची पडताळणी
- जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीची जैय्यत तयारी सुरू झाली असून ई. व्हि.एम. मशीनची तपासणी व मतमोजणीचे डेमो उमेवारांच्या व कार्यकर्त्यांच्या समक्ष बुधवारी आदिवासी भवन येथे निवडणूक निरीक्षक देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारी पवनीत कौर व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली दाखविण्यात आले.
उमेदवारांनी ज्या ई. व्हि. एम. मशीनवर निवडणूका होणार आहेत, त्याच मशीनची नोंदणी, मशीन क्रमांक, बॅटरी क्र. पडताळणी केली. उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी याच मशिनवर १०० ते ११० वेगवेगळी मते देऊन खात्री करून घेतली. सर्व मशीनची तपासणी करून मतपेट्या बंद करण्यात आल्या असुन त्या आता दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी मॉक तपासणी नंतर कार्यान्वीत होतील.
राष्टÑवादीच्या आरोपांना सेनेचे आज प्रत्युत्तर
जव्हार : निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार म्हणून कॉँग्रेस राष्ट्रवादीने घाई करीत आपले स्टार प्रचारक बोलावून सभा गाजवल्या. अनेक आरोपाच्या फैरी झाडल्या. मात्र, याला उत्तर देण्यासाठी आता शिवसेनेने कंबर कसली असून उद्या (१५) सेनेचे प्रमुख वक्ते गुलाबराव पाटील यांची सभा घेण्यात येणार आहे. यामुळे विरोधकांची तारांबळ उडाली आहे.
काही दिवसां पुर्वीच झालेल्या राष्ट्रवादीच्या जाहिर सभेत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना आणि त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर सडकून टीका केली होती. या शाब्दिक हल्ल्याला शिवसेनेकडून अजून जाहिर उत्तर दिले गेले नसल्याची चर्चा शहरात आहे. मात्र, राष्टÑवादीला प्रतिउत्तर देण्यासाठी शुक्रवारी सेनेचा तोफखाना उतरणार आहे.
या सभेसाठी गुलाबराव पाटील, हाजी अराफत शेख, एकनाथ शिंदे हे येत असून यासाठी शिवसैनिकानी जोरदार तयारी चालविली आहे. सध्या दुरंगी लढतीचे चित्र असून यामध्ये सेना आणि राष्ट्रवादी व्यासपीठावर आणि प्रभागातही आमने सामने उभे ठाकले आहेत. त्यातच शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार चंद्रकात (भिकू) पटेल हे काय भूमिका घेणार याचीही मतदारांना उत्सूक्ता आहे.