वसईतील सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली लस; दुसऱ्या टप्प्यात २० टक्के लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 02:14 AM2021-03-21T02:14:24+5:302021-03-21T02:14:45+5:30
परिसरातील सातही पोलीस ठाण्यांमध्ये १०० टक्के प्रतिसाद
मंगेश कराळे
नालासोपारा : वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांत कार्यरत असलेले १०० टक्के पोलीस अधिकारी, महिला आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोनाची पहिली लस घेतली आहे. तर २० टक्के पोलिसांनी कोरोनाची दुसरी लस घेतली आहे.
मनपाकडून लस देण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होत असल्याने ज्या पोलिसांना लसीकरणाची तारीख देण्यात येते, तेव्हा ते पोलीस लसीकरण केंद्रात जाऊन लस घेत आहेत.
वसईच्या सातही पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनापासून बचावासाठी महानगरपालिकेच्या ॲपवर जाऊन लसीकरणासाठी नोंदणी करत आहेत. महानगरपालिकेच्या २४ लसीकरण केंद्रांवर नोंदणीच्या दिवशी जाऊन लस घेत आहे. १०० टक्के पोलिसांनी पहिला डोस घेतला असून १५ ते २० टक्केे पोलिसांनी दुसरा डोस घेतला आहे.
सातही पोलीस ठाण्यांत कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांनी कोरोनाचा पहिला डोस घेतलेला आहे. ज्या बाल संगोपन आणि प्रसूती रजेवर आहेत त्यांनीसुद्धा पहिला डोस घेतलेला आहे. त्यांचा यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. वसईच्या १०० टक्के पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला असून दुसरा डोस सुरू झाला आहे. १५ ते २० टक्के पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. ज्यांना ऑनलाइन तारीख भेटत आहे त्यानुसार लसीकरण केंद्रात जाऊन डोस घेत आहेत.