वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 01:20 AM2020-08-19T01:20:47+5:302020-08-19T01:21:11+5:30

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

All shops in Vasai-Virar municipal area open! | वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू

वसई-विरार महापालिका हद्दीतील सर्व दुकाने सुरू

Next

आशिष राणे
वसई : वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र तसेच जिम आणि स्विमिंग पूल वगळता मंगळवारपासून सर्व दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत खुली करण्यात आली आहेत. अनलॉक-२ व ३ मध्ये सम-विषम तत्त्वावर दुकाने आयुक्तांच्या निर्देशानुसार अजूनपर्यंत सुरू होती. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत सर्व दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने सोमवारी संध्याकाळी उशिरा वसई-विरार महापालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांनी याबाबतचे लेखी आदेश काढल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
राज्य सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यापूर्वी दुकानांसाठी पी-१ व पी-२ असा सम-विषम नियम लागू होता. त्यामुळे शहरात महिनाभरात साधारण १२ दिवस दुकाने खुली राहत होती. त्यामध्ये मिळणाऱ्या उत्पन्नातून कामगारांचा खर्च, दुकानाचे भाडे देणेही कठीण होते. त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने सातही दिवस खुली राहावीत यासाठी राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यावर निर्णय घेत मुंबईसह एमएमआर रिजनमधील आयुक्त यांनी आपापल्या स्तरावर सर्व दुकाने खुली ठेवता येतील का याचा सारासार विचार व आरोग्य सर्वेक्षण करून निर्णय घ्यावयाचा आहे, असे अधिकार प्राप्त झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी यापूर्वीची सम-विषम पद्धत दि. १७ आॅगस्टच्या आदेशानुसार बंद केली. दरम्यान, नव्या आदेशानुसार आता वसई-विरारमधील प्रतिबंध क्षेत्र तथा जिम व स्विमिंग पूल वगळता शहरातील सर्व दुकाने सुरू होत असल्याने आता छोट्या-मोठ्या दुकानदारांना दिलासा मिळाला आहे. विशेषत: मद्यविक्रीच्या दुकानांचाही यात समावेश आहे. मद्यविक्रीची दुकानेही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उघडी राहणार असून गर्दी न होता तोंडाला मास्क, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून मद्यविक्री करता येणार आहे. शहरातील सर्व दुकानदारांनी कोणत्याही नियमाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा देखील महापालिकेने दिला आहे. आता गणेशोत्सव चार दिवसांवर असताना असे आदेश निघाल्याने वसईकरांना कोरोना संकटात हा एक दिलासा मिळाला आहे.
>पालिका क्षेत्रात रुग्ण दर १४ टक्क्यांवर!
शहरातील बाधित रूग्णसंख्या, मृत्यू व मुक्त संख्या कमी होण्याकामी विविध उपाययोजना मनपाने राबविल्या आहेत. यामध्ये जास्त रुग्णसंख्या असलेले क्षेत्र मोठे करून त्या भागात लॉकडाऊन करणे, गर्दी होणाºया दुकानावर व भाजी विक्रेत्यांवर कारवाई करणे, दंड आकारणी, शहरात चाचण्यांची संख्या वाढवणे, त्यामुळे सध्या वसई-विरारमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे आणि हा आकडा आता दिवसागणिक १४ टक्क्यांवर आलेला आहे, ही बाब नक्कीच दिलासादायक आहे.

Web Title: All shops in Vasai-Virar municipal area open!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.