प्रचाराचा सारा ट्रेंडच बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:02 AM2018-05-24T02:02:18+5:302018-05-24T02:02:18+5:30
साधने आणि मार्ग बदललेत : सोशल मीडियाला आले महत्व
विक्रमगड : ग्रामीण भागात निवडणुकीचा प्रचार म्हटला की तरुण कार्यकर्ते हातात उमेदवाराचे फोटो, जाहिरनामे घेऊन आणि रीक्षेला भोंगा लाऊंन त्या गगणभेदी घोषणा देत फिरायचे पण या आधुनिक काळात हे सर्व बदलले आहे. प्रचार ही हायटेक झाला आहे. सोशल मिडिया चा वापर वाढला आहे. पालघर लोकसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे.
सर्वत्र रणधुमाळी पाहायला मिळत आहे. आता प्रचार यंत्रणा ‘हायटेक’ होऊनही ‘डोअर टू डोअर’ मतदारांच्या भेटीवर सर्वाधिक भर दिला जात आहे. पूर्वीच्या गगनभेदी घोषणा आता लुप्त झाल्या असून भोंग्यांचा कर्कश आवाज, गाणी, घोषणा यांची जागा घेत सोशल मीडिया. इतर निवडणुकांच्या तुलनेत लोकसभा कार्यक्षेत्र आकारमानाने मोठे असल्याने प्रचार करणारे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ‘हायटेक’ प्रचार यंत्रणेत इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अॅप या माध्यमातून पारंपरिक प्रचार यंत्रणेला ‘खो’ दिला गेला आहे. आणि त्याची जागा तात्काळ व जलद गतीच्या ‘इलेक्ट्रॉनिक’ यंत्रणांनी जागा घेतली; पण सर्व उमेदवारांचा भर ‘डोअर टू डोअर’ जाण्यावर अधिक भर आहे. प्रचाराला कमी दिवसांचा अवधी मिळत असल्याने पूर्वीसारखी दिर्घ रंगत आता पाहायला मिळत नाही. होर्डींग, फ्लेक्स, कटआऊटने जागा व्यापून आपल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचिवण्याचा प्रयत्न केला जात असून पूर्वी उमेदवारांच्या विश्वासू, निष्ठावान कार्यकर्त्यांची एक फळीच असायची. ते निष्ठेने कार्य करायचे. त्यासाठी ते पदरचा खर्च करायचे. आता मात्र भाडोत्री कार्यकर्त्यांचा जमाना आहे. सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या भोजनापर्यंत सगळा खर्च करून शिवाय ४०० ते ५०० रुपये रोज त्यांना दिले जातात. सगळेच पक्ष हा प्रकार करीत असल्याने एकच कार्य करतात. सकाळी एका पक्षाचा तर दुपारी दुसऱ्या पक्षाचा असल्याचे पहायला मिळते.
यामुळे अशा भाडोत्रींची मात्र सध्या चांगलीच चंगळ होत आहे.
सोशल मीडिया हे तरु ण मतदारा पर्यन्त पोहचण्याचे प्रभावी माध्यम आहे. पालघर जिल्हातील ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात मतदार सोशल मिडियाचा वापर करतात त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत हायटेक प्रचार आणि सोशल मीडिया द्वारे केलेला प्रचार मतदाराणा आकर्षित करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
- नीलेश सांबरे, अध्यक्ष,कोंकण विकास मंच
या निवडणुकीच्या प्रचारात ग्रामीण व शहरी भागाचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीचा प्रचार करत आहोत. कमी वेळात जास्तीत जास्त मतदारान पर्यंत पोहचण्याचे प्रभावी माध्यम सोशल मीडिया ठरत आहे. त्यामुळे सोशल मिडीयाद्वारे केलेला प्रचार आमच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
- सुशील औसरकर, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पालघर