युती-आघाडीचा फैसला ३० डिसेंबरलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:56 PM2019-12-24T23:56:35+5:302019-12-24T23:56:47+5:30
अर्ज छाननी : जिल्हा परिषदेसाठी ३६१ तर पं. स.साठी ६५३ नामनिर्देशनपत्र वैध
पालघर/डहाणू : पालघर जिल्हा परिषद व आठ पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून मंगळवारी झालेल्या छाननीनंतर वैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पालघरच्या ८८ नामनिर्देशन पत्रापैकी ८७ वैध झाली आहेत. दरम्यान, ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी कोण कुणासमोर लढणार, तसेच युती आणि आघाडीचे समीकरण समजणार आहे.
डहाणू जिल्हा परिषदेसाठी ७० आणि पंचायत समितीसाठी ११३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, सोमवारी आॅनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र भरण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. त्यात जिल्हा परिषदेच्या १३ गटांसाठी ७१, तर पंचायत समितीच्या २६ गणांसाठी ११५ नामनिर्देशन पत्र भरण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सौरभ कटियार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग यांनी दिली. नामनिर्देशन पत्राची छाननी मंगळवारी करण्यात आली. त्यात जि.प. गटातील एक, तर पंचायत समितीच्या गणातील दोन नामनिर्देशन पत्र बाद ठरविण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात ७०, तर पंचायत समितीच्या रिंगणात ११३ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
जव्हारमध्ये जि.प.चे २० तर पं.स.चे ४१ उमेदवारी अर्ज ठरले वैध
जव्हार : जव्हार तालुक्यातील जि.प. पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ४ जागांसाठीचे २० उमेदवारी अर्ज वैध ठरले असून पंचायत समितीच्या ८ जागांसाठी ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये अनेक अपक्ष आणि वाटाघाटीच्या हिशोबाने भरलेले उमेदवारी अर्ज दाखल असल्याने अर्ज माघारीच्या दिवशीच या उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जव्हारमध्ये तूर्तास तरी महाआघाडीच्या सूत्रानुसार राष्ट्रवादी बविआ आणि काँग्रेसचे जागा वाटप झालेले असून भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत असल्याचे चित्र आहे. जव्हारमध्ये झेडपीच्या ४ आणि पंचायत समितीच्या ८ जांगासाठी ही निवडणूक होत आहे. वावर गणातील पंचायत समितीकरिता वय कमी असल्यामुळे बाद करण्यात आला तर न्याहाळे येथील जात पडताळणी नसल्यामुळे २ अर्ज बाद करण्यात आले.
वाडा पं.स.तील एक अर्ज बाद
वाडा : पालघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मंगळवारी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली. या वेळी मोज गणातून लोकेश रामचंद्र पाटील यांनी सूचकाचे नाव दुसऱ्या गणातील व्यक्तीचे टाकल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यामुळे आता १३१ उमेदवारी अर्ज वैध राहिले. अर्ज मागे घेण्याची तारीख ३० डिसेंबर आहे.
तलासरीतही चार अर्ज अवैध
तलासरी : तलासरीत जिल्हा परिषद गटाच्या पाच आणि पंचायत समितीच्या १० गणांच्या जागांसाठी एकूण ८७ उमेदवारी अर्जदाखल झाले आहेत. त्या अर्जाची छाननी मंगळवारी तहसील कार्यालयात होऊन जि. प. गटातील ३० अर्जापैकी उधवा गटातील १ अर्ज बाद झाला, तर पंचायत समिती गणांच्या ५७ अर्जांपैकी झरी, डोंगारी, उधवा या तीन गणांतील प्रत्येकी एक अर्ज असे तीन अर्ज बाद झाले आहेत.