आलोंडे शाळा कोसळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:11 AM2017-07-18T02:11:57+5:302017-07-18T02:11:57+5:30
आलोंडा येथील जि.प. शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती असल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या ९७ विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे.
- राहुल वाडेकर । लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड: आलोंडा येथील जि.प. शाळेची इमारत कोणत्याही क्षणी कोसळेल अशी स्थिती असल्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या ९७ विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे. येथे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण दिले जात असून शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी आता पर्यंत १७ वेळा धोकादायक इमारतीचा प्रश्न जिल्हा शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुखां समोर मांडला आहे. मात्र, लालफितीत आडकलेल्या जिल्हा प्रशासनाने त्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन सध्या ही शाळा खाजगी जागी भरविली जात असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सदु कोरडा व उपाध्यक्ष प्रविण बोडके यांनी लोकमतला दिली. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा यासाठी शासनाकडून विद्यार्थी पटसंख्येनुसार शाळां सुरु करण्याची प्रक्रिया आहे. यावर शासनाचा कोटयावधी रुपये खर्च होत असतो. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे़.
२३६ शाळांमधील अनेक ठिकाणच्या जि़ प़ शाळांची अशीच अवस्था असून तालुक्यातील खडकी, मेढी, अवचीतपाडा, म्हसरोली, चिंचघर, भोईरपाडा (करसूड), घाणेडे, धामणी, कुंर्झे, द्गडीपाडा (कुंर्झे), ब्राम्हणेपाडा, चाबके तलावली, दादडे व आलोंडे अशा एकुण १४ शाळांच्या २० वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने त्या धोकादायक बनत चालेल्या आहेत़ मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप पालक वर्गाने केला आहे.
आलोंडा गावातील जि.प. शाळेच्या दुरावस्थेकडे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे शिक्षण विभाग सप्शेल दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे आम्ही आता विदयार्थी, पालकासह महिनाभरात उपोषणास बसून न्याय मागणार आहोत, असा इशारा आलोंडा गावचे सरपंच प्रदिप भोइर यांनी लोकमतशी बोलतांना दिला.
विक्रमगड तालुक्यातील जि.प. शाळांच्या धोकादायक इमारतींबाबत जिल्हा पातळीवर पत्रव्यवहार केलेला असून बाबतची संपूर्ण माहिती त्यांना देण्यात आली आहे़
-भगवान मोकाशी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी (विक्रमगड)
आलोंडा जि़ प़ शाळा ही ६० वर्षाची जुनी असल्याने पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. याबाबत १७ वेळा तक्रारी करुनही उपाय योजना झालेली नाही़
-सदु कोरडा, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती