वन अधिकाऱ्याच्या खाजगी वाहनात अंबरदिवा; डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयासमोरची घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 07:20 PM2018-12-24T19:20:37+5:302018-12-24T19:21:59+5:30
अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी - डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची MH-05:DS-2452 कार सोमवार, 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ...
अनिरुद्ध पाटील
डहाणू/बोर्डी - डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची MH-05:DS-2452 कार सोमवार, 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास उभी होती. त्यामध्ये चालकाच्या सीट समोर, बाहेरून दिसेल असा अंबर दिवा लावण्यात आला होता. एखादा वन विभागाचा अधिकारी कायद्याचा भंग करून शासकीय नियम पायदळी तुडवत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यावर कारवाईची गरज अधोरेखित होत आहे. तर खुलेआम विकले जाणारे अंबरदिवे हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.
या कारमध्ये हा अंबरदिवा लावण्यात आला आहे. तर कारच्या मागच्या बाजूस एखाद्या वन अधिकाऱ्याची कॅप ठेवलेली दिसत होती. शासनाने दिलेले अधिकार वैयक्तिक स्वार्थासाठी वापरून वन अधिकारी कायदा पायदळी तुडवत आहेत. नागरिकांना जरब बसावी अशी ही कृती आहे. तर टोल चुकविणे, बिनदिक्कत पार्किंग, ट्राफिक मधून रस्ता मोकळा करून घेण्यासाठी हा फार्मूला सर्रास वापरला जातोच. मात्र या अधिकाऱ्यांनी हे कृत्य का केले हे समजणे तितकेच आवश्यक आहे. या करिता अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु डहाणू उपवन संरक्षक भिसे तसेच डहाणू वन परिक्षेत्र अधिकारी मराठे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी करून या अधिकाऱ्यास कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. तर शासकीय वाहनांवर लावणारे अंबरदिवे विकण्याचा धंदा रोखणे हे प्रशासनापुढे आव्हान आहे.
दरम्यान, डहाणू हे पर्यटन स्थळ असून सध्या या हंगामाला प्रारंभ झाला आहे. या काळात परगावतील पर्यटक खाजगी वाहनांवर त्यांच्या शासकीय हुद्यांच्या पाट्या लावतात. अशा बेकायदेशीर कृत्यावर आळा बसावा याकरिता आरटीओ आणि पोलीस विभागाने कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.