घोडांच्या मातोश्रीवारीची वनगांची खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 11:48 PM2019-10-07T23:48:03+5:302019-10-07T23:49:06+5:30
सोमवारी दुपारी आ. रवींद्र फाटक यांनी आपल्या समर्थकांसह अमित घोडा यांना सोबत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.
- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात शिंदेशाही आणण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमच्या व्यूहरचनेला सुरुवात झाली आहे. श्रीनिवास वनगा यांच्या विजयाला धोका पोचण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांनी सरळ महाआघाडीचे उमेदवार अमित घोडा यांना मातोश्रीची वारी करवली. उमेदवारी अर्जात काही त्रुटी राहिल्याने तुझा अर्ज बाद होणार असल्याचे सांगून निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचे सांगितले जाते. प्रचंड दहशतीच्या वातावरणाखाली त्यांच्यावर हल्ला होणार असल्यानेच दबावाखाली येत अमित घोडा यांनी माघार घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
सोमवारी दुपारी आ. रवींद्र फाटक यांनी आपल्या समर्थकांसह अमित घोडा यांना सोबत घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी प्रक्रिया पूर्ण केली. पालघरमध्ये महाआघाडीतर्फे मला राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी दिली होती. असे असतानाही काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांनी उमेदवारी अर्ज भरला. कालपर्यंत काँग्रेस उमेदवाराने आपला अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय घेतला नाही. त्यामुळे आपण अर्ज मागे घेतल्याचे पत्रकारांना सांगितले.
दरम्यान, घोडा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना स्वत: आणि पत्नीचे गेल्या ५ वर्षांचे ३१ मार्चपर्यंतचे आयकर विवरण (इन्कम टॅक्स) पत्र सादर करताना ३ वर्षांचे विवरण पत्र सादर केले. तर शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असतानाही गेल्या १० वर्षांत ताबा घेतल्याच्या माहितीत ‘नाही’ असे उत्तर लिहिले आहे.
यावर सेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी लेखी आक्षेप नोंदविल्याने तुझा उमेदवारी अर्ज फेटाळून लावला जाईल, कोर्टात खेचू अशी भीती दाखिवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. यावर अमित घोडा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यावेळी महाआघाडीने मोठे शक्ती प्रदर्शन केल्याने सेनेला धडकी भरली होती. त्यामुळे सेनेकडून अमित घोडा यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जात, प्रचारादरम्यान त्यांच्यावर अथवा त्यांच्या घरावर हल्ला होणार असल्याचे संकेत होते. या धमक्यांना घाबरून दहशतीच्या वतावरणाखाली घोडा यांनी नाईलाजाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड यांनी केला आहे.
सेना महायुती पुढे महाआघाडीने उभ्या केलेल्या आव्हानामुळे सेनेच्या गटात काही अंशी चलबिचल सुरू होती.
ठाकरे यांच्या भेटीनंतर निर्णय बदलला?
- अमित घोडा यांनी डहाणू भागात आदिवासी गाव-पाड्यात बनविलेल्या संघटनांची ताकद, सेनेतील नाराजांची मिळणारी कुमक, जोडीला काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, माकप, जनता दल, आदींची साथ, त्यातच काही काळासाठी आपल्या पक्षापासून लांब राहिलेले आ. आनंद ठाकूर हेही पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय झाले.
- अमित घोडा सेनेसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे पाहिल्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीम सक्रीय झाल्या. रविवारी सकाळी अमित घोडा यांनी आ. ठाकूर यांची भेट घेत काँग्रेसच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी चर्चाही केली. त्यानंतर शिंदे यांच्या टीमने अमित यांना गाठत ठाणे आणि तेथून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घडवली, त्यानंतर हा निर्णय झाल्याची चर्चा आहे.