अमित झा प्रकरण : तपास जिल्ह्याबाहेरील अधिका-यामार्फत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:07 AM2018-02-03T06:07:00+5:302018-02-03T06:07:06+5:30
अमित झा आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कक्षाबाहेरील त्रयस्थ अधिका-याकडे तपास वर्ग करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली आहे.
- शशी करपे
वसई : अमित झा आत्महत्येप्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कक्षाबाहेरील त्रयस्थ अधिका-याकडे तपास वर्ग करण्याची विनंती पोलीस अधीक्षकांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांच्याकडे केली आहे.
विरार येथील विकास झा आत्महत्येप्रकरणी पोलीस निरीक्षक युनुस शेख यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी अमित झाने पाठपुरावा केला होता. मात्र, पोलिसांनी शेख यांना क्लीन चिट देऊन मुनाफ बलोच याच्यावर तब्बल दोन महिन्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यातून अमित झाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात युनुस शेख, मुनाफ बलोच, अमर झा, मिथिलेश झा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास वसई डीवायएसपींकडे सोपवण्यात आला आहे. झा बंधूंनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ क्लिप तयार करून पोलिसांवरच ठपका ठेवला होता. झा आत्महत्येनंतर सध्या सोशल मिडीयावर सुरु असलेल्या चर्चेची गंभीर दखलही सिंगे यांनी केली आहे. कुणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. या गुन्ह्यात पोलीस अधिकाºयावरही गुन्हा दाखल करून कायद्यात सर्व समान असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, सोशल मिडीयावर चुकीची माहिती दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सिंगे यांनी दिला आहे.
दरम्यान, अमित झा आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांची मुख्यालयात बदली करण्यात आली होती. आता नवल बजाज यांनी शेख यांची जिल्हयाबाहेर बदली करून त्यांना ठाणे ग्रामीण पोलीस हद्दीत पाठवले आहे.
एसपींनी केली विनंती
या गुन्ह्यात पोलिसांवर संशयाची सुई असल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरु आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी अमित झा प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे त्रयस्थ तोही जिल्हयाबाहेरील अधिकाºयामार्फत व्हावा, अशी विनंती नवल बजाज यांच्याकडे केली आहे.