अमित शहा भेटीबाबत उद्धव ठाकरे यांचे मौन, मात्र स्वबळावर लढण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:11 AM2018-06-08T06:11:33+5:302018-06-08T06:11:33+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
तलासरी (जि. पालघर): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री’ भेटीबाबत बोलणे टाळले; मात्र ‘साम-दाम-दंड-भेद’वाल्यांना पालघरमध्ये शिवसेनेने घाम फोडला, असा टोला हाणत पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
पालघरमधील शिवसैनिकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उद्धव ठाकरे येथे आले होते. वनगा कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सभेत उद्धव यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्ला चढवला. पालघरमध्ये नैतिक विजय आपलाच झालेला आहे. आता येथून आपला खासदार निवडून आल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचे नाही. आता जे काही चालले आहे, ती सगळी नाटके आहेत. खरा पिक्चर पुढे आहे आणि त्या पिक्चरचा हिरो तूच आहेस, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी पालघरमधून श्रीनिवास वनगा हेच शिवसेनेचे उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. श्रीनिवास वनगा यांच्याकडे पालघर मतदारसंघाच्या संघटकपदाची जबाबदारी सोपवत असल्याची घोषणाही उद्धव यांनी केली.
स्वबळावर राऊत ठाम!
अमित शहा यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले असले, तरी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र युती होणार नसल्याचे संकेत दिले. ते म्हणाले, आम्हाला माहीत आहे की, अमित शहा यांचा अजेंडा काय आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यात आता कोणताही बदल शक्य नाही.
आयोगावर टीका
निवडणूक आयोगावरही उद्धव यांनी टीकास्त्र सोडले. निवडणुकीत पैसे वाटप करणाऱ्यांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडून दिलेले असताना त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. हेच शिवसैनिकांबाबत घडले असते तर? हीच लोकशाही आहे का, असा सवालही ठाकरे यांनी केला.