अमोलचे स्वप्न लवकरच गगनभरारी घेणार!, मॅग्नेटीक महाराष्ट्राची उपलब्धी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:13 AM2018-02-22T00:13:28+5:302018-02-22T00:13:35+5:30
कॅप्टन अमोल यादव यांचे स्वदेशी विमान बनवून ते आकाशात झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता जिल्ह्यातील केळवे येथे विमान कारखान्यासाठी राज्य शासनाच्या एमआयडीसी मार्फत जागाही मंजूर करण्यात आली
हितेंन नाईक/निखिल मेस्त्री
पालघर : कॅप्टन अमोल यादव यांचे स्वदेशी विमान बनवून ते आकाशात झेपावण्याचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता जिल्ह्यातील केळवे येथे विमान कारखान्यासाठी राज्य शासनाच्या एमआयडीसी मार्फत जागाही मंजूर करण्यात आली आहे. यासाठी अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटींचा करार झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. त्यामुळे अखेर अमोल यादव यांची प्रतीक्षा संपली आहे. आता राज्य सरकारने तात्काळ या कराराची अंमलबजावणी करुन जागेचा ताबा द्यावा. म्हणजे हा कारखाना लवकरात लवकर उभा होऊन त्यामध्ये पहिलें विमान तयार होईल असे अमोल यादव यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
पहिला भारतीय विमान निर्माता अशी ख्याती प्राप्त झालेले कॅप्टन अमोल यादव यांनी १५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय झाले याची सविस्तर चर्चा त्यांनी लोकमतशी केली आहे.
प्रश्न : आपण राष्ट्रपतींची भेट घेतली ही भेट कशी घडली काय सांगाल या विषयी ?
अमोल यादव : गेल्या महिन्यात राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांची भेट झाली होती. तेव्हा मी माझा प्रकल्प तिथे मांडला व चर्चाही केली. तेव्हा राष्ट्रपतींनी मला भेटीस आमंत्रित केले. त्याप्रमाणे मला त्यांच्याकडून निमंत्रण मिळाले. मी १५ फेब्रुवारी रोजी माझे कुटुंबीय व माझ्या विमान कंपनीतील माझे सहकारी असे आम्ही ११.३० वाजता राष्ट्रपती भवनात गेलो.
प्रश्न: आपण राष्ट्रपतींना भेटलात या भेटीदरम्यान काय झाले व प्रथम भारतीय विमान निर्माता म्हणून त्यांनी आपणाकडून भेटीदरम्यान काय अपेक्षा ठेवल्या?
अमोल : मी सर्वसामान्य कुटुंबातील एक आहे. राष्ट्रपतींनी माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त करणे याहून मोठी अभिमानाची गोष्टच नसेल माझ्या विमाननिर्मितीसाठी ज्यांनी मला बळ दिले असे माझे सहकारी व माझे सर्व कुटुंबिय यांनाही निमंत्रण होते. त्यामुळे खूप उत्साही वातावरण आमच्यात होते.
आम्ही भवनात गेलो तेथे राष्ट्रपती आले. त्यांना बरोबर माहित होत मी अमोल आहे म्हणून. त्यांनी माझ्याकडे येऊन माङयाशी हस्तादोलन केलं आणि त्यानंतर सोबत असलेल्या सर्वांची ओळख करून घेतली. राष्ट्रपतींनी त्यांची आपुलकीनं विचारपूस केली. त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली.
त्यांनी मला माझ्या विमान प्रकल्पाविषयी माहिती विचारली. प्रकल्प कुठपर्यंत आला आहे. विमानाचं स्टेटस काय आहे ते ही त्यांनी मला विचारलं. त्यानंतर नागरी उड्डाण निर्देशनालय (डीजीसीए) कशा रीतीने मदत करते आहे. त्याचीही माहिती विचारली व चौकशी केली.मी त्यांना ही सगळी कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्यांनी मला सांगितले कि पुढच्या काही काळात तूङया यशाची उंची वाढून जगात तुझी खूप मोठी कीर्ती होणार आहे. भारतवासीयांना तुझा अभिमान असेल.
तुझ्या विमानाची उड्डाण चाचणी कधी होणार आहे, असे त्यांनी मला पुढे विचारले. दीड-दोन महिन्यात काही तांत्रिक बाबी पूर्ण करून हे विमान निर्मितीचे काम अधिकृत (आॅफिशियली) होतील असे मी त्यांना सांगितले.टेस्ट फ्लाइटचा पहिला वैमानिक कोण असणार आहे? असा प्रश्न राष्ट्रपतींनी मला केल्यावर मीच पहिला वैमानिक असणार असल्याचे सांगितले. या पहिल्या फ्लाईट मधील पहिले पॅसेंजेर होण्याचा मान तुझ्या आई-वडिलांचा असला पाहिजे व तो त्यांचाच आहे असे राष्ट्रपतींनी मला सांगितले. प्रकल्पाला लागणारा खर्च किती, जागा किती लागणार, भांडवल किती लागेल याची मी त्यांना इत्यंभूत माहिती दिली.
मुख्यमंत्री हे तुमच्या मागे भक्कमपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्ही नक्की चांगले काम कराल आणि तुमचा विमान बनविण्याचा प्रकल्प संपूर्ण देशाला अभिमानास्पद असा ठरेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
निधी अभावी रखडली विमानाची निर्मिती
पालघर येथील केळवा येथे या प्रकल्पासाठी जमीन मिळणार आहे.जागा मिळाल्यानंतरच विमान बनविण्याचे माझ काम असलं तरी गेल्या वर्षीच ते मी सुरु केलेल आहे.गत वर्षी मी म्हटलं होत कि जमीन मिळाल्यानंतर एक वर्षभरात विमान तयार करिन. शासकीय कामे होण्यासाठी पेपर वर्क व मान्यता वगैरे साठी उशीर लागतो हे मी जाणून होतो. म्हणून १४ मे २०१७ ला आपण १९ सीटर विमान निर्मितीचे काम आॅलरेडी सुरु केलेले आहे. इंजिन कॅनडामध्ये तयार झालेल आहे. निधीच्या उपलब्धते अभावी ते थोडे लांबले आहे. लवकरात लवकर या बाबींची पूर्तता करून येत्या काही महिन्यात हे विमानही तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
असे अनेक अमोल मदतीच्या प्रतिक्षेत आहेत
हो ! मी सांगू इच्छितो कि कॅप्टन अमोल यादव सारखे व त्याहूनही चांगले अमोल या भारतात आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही.पण अशा विविध क्षेत्रातील नैपुण्यवंताना त्या क्षेत्रात काहीतरी करायची इच्छा असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यातील गुण व देशासाठी काहीतरी करण्याची धडपड ओळखून त्यांना वाव मिळाला तर ते ही भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करतील, असा माझा विश्वास आहे असे शेवटी त्यांनी सांगितले.