लग्नाच्या आहेराची धनराशी सैनिक फंडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:44 PM2019-02-28T23:44:51+5:302019-02-28T23:45:08+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार : डहाणूतील राजपूत कुटुंबीयांच्या निर्णयाचे स्वागत
अनिरुध्द पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : पुलवामा येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशभर हळहळ आणि पाकिस्तानविषयी द्वेष भावना निर्माण झाली. दरम्यान, आपल्या सुख:करीता जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिक परीवारांसाठी मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व धनराशीच देण्याचा निर्णय डहाणू शहरातील सरावली येथल्या अशोक ओघडभाई राजपूत आणि कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांच्या या देशप्रेमाविषयी सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राजपूत कुटुंबीय सरावली मानफोडपाडा असून त्यांची थोरली मुलगी भावना (२५) हिचा विवाह सेलवासाच्या कोडिणार गावातील वालजीभाई जेठवा यांच्या इंजिनीयर मुलगा केतुल (२६) यांच्याशी २४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आहे. लगीनघाई सुरू असताना १४ फेब्रुवारी रोजी पुलावामा येथील दहशतवादी हल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभर शोककळा पसरली. लग्नकार्याच्या तोंडावर हे घडल्याने राजपूत कुटुंबीय हेलावून गेले. समाजात आणि माध्यमांमध्ये शहिद व त्यांच्या कुटुंबियांविषयी ऐकताना मन कष्टी बनायचे असे अशोक राजपूत यांनी सागितले.
आपण जो आनंद साजरा करतो, हा सैनिकांमुळे असून त्यांच्या करिता काही केले पाहिजे, या भावनेतून विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला द्यायचा विचार त्यांच्या मनात आला.
आहेरांची पाकीटे मुहूर्तावर फोडणार आहोत. किमान दीड लक्ष रूपयांचा आहेर येणे अपेक्षित आहे. जरी २ किंवा ३ लाखांच्या घरात रक्कम गेली, तरीही पै अन पै सैनिकांच्या नावेच जमा केली जाईल.
- अशोक राजपूत, वधुचे पिता
डहाणूतील राजपूत कुटुंबियांनी सैनिकांविषयी दाखवलेल्या भावना आदर्शवत आहेत. या शहरातील नागरिक सुजाण असल्याचे हे उत्तम उदाहरण असून त्याचे अनुकरण झाले पाहिजे.
- सौरभ कटियार, प्रांत अधिकारी, डहाणू