तारापूरमधील स्फोटात इंजिनीअरचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 10:06 AM2023-02-18T10:06:11+5:302023-02-18T10:06:26+5:30

कारखान्यात दुर्घटना; तीन कामगार जखमी

An engineer died on the spot in an explosion in Tarapur | तारापूरमधील स्फोटात इंजिनीअरचा जागीच मृत्यू

तारापूरमधील स्फोटात इंजिनीअरचा जागीच मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जे.पी.एन. फार्मा या कारखान्यात झालेल्या रिॲक्टरच्या स्फोटात प्रयाग घरत (वय २४) या इंजिनीअरचा जागीच मृत्यू झाला. अपघातात  अन्य तीन कामगार जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तीन वर्षांपूर्वी याच कारखान्यात झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला होता.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्र. टी. १०८ व १०९ वरील जे.पी.एन. फार्मा या कारखान्यात सकाळी १० वाजेच्या सुमारास रासायनिक प्रक्रिया सुरू असताना रिॲक्टरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेल्या वायूची बाधा होऊन प्रयाग घरत याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कामगारांनी तातडीने बाहेर पळ काढला. 

त्यामुळे वेळीच उपचार मिळू शकले नाहीत
बेशुद्धावस्थेत पडलेल्या प्रयागला वेळीच उपचार मिळू शकले नाहीत. घटनास्थळी बोईसर पोलिस, अग्निशमन दल आणि औद्योगिक व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पीसीएल-३ या वायूची बाधा झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त त्यांनी केली आहे. प्रयागचे आई- वडील शेती करतात. तो एकुलता एक होता. दोन महिन्यांपूर्वीच तो नोकरीला लागला होता. दुर्घटनेत तिलक राजकुमार बर्मा (वय ४१), युसूफ अयुब मुल्ला (वय ३४) आणि सदानंद लोहार (वय ३९) हे तीन कामगार जखमी झाले आहेत. 

औद्योगिक सुरक्षा विभागाकडून बॉयलर, रिॲक्टर आदी उत्पादित प्रक्रिया करणाऱ्या यंत्रांची नियमित, कठोर तपासणी करणे अपेक्षित असताना अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी आहेत. जे.पी.एन. फार्मा कारखान्यात बल्क ड्रगचे उत्पादन घेतले जाते. येथे ४९ कामगार काम करतात.

Web Title: An engineer died on the spot in an explosion in Tarapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.