महामार्गावर ऑइल घेऊन जाणारा टँकर उलटला; डिझेल समजून घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 02:19 PM2024-09-26T14:19:40+5:302024-09-26T14:20:01+5:30
शशिकांत ठाकूर लोकमत न्यूज नेटवर्क कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४० च्या सुमारास चारोटी ...
शशिकांत ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४० च्या सुमारास चारोटी नजीक ऑइल वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात झाला आहे. यामध्ये टँकर मधून ऑईलची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
गुजरातकडून मुंबईकडे निघालेल्या टँकर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती देण्यात येत आहे. टँकरमध्ये कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी प्रसाधने बनवण्यासाठी लागणारे हायड्रोजन कार्बन ऑइल असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे. मात्र याला डिझेलसारखा उग्र वास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून सदर ऑइल घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही मालवाहू वाहन चालकांनी हे डिझेल असल्याचे गृहीत धरत वाहनांमध्ये भरून घेतले आहे. दरम्यान हे डिझेल नसल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
महामार्गावर टँकर मधील ऑइल गळती झाल्यामुळे काही काळ दोनही वाहिन्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यांनतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून वाहन बाजूला काढण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.