चेन्नईत मित्राचा खून करुन पळून गेलेल्या भूमिगत आरोपीला ५ वर्षानंतर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 06:57 PM2023-05-13T18:57:31+5:302023-05-13T18:57:54+5:30
वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश
मंगेश कराळे
नालासोपारा : चेन्नईत मित्राचा खून करून पळून गेलेल्या भूमिगत आरोपीला तब्बल ५ वर्षांनंतर वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तामिळनाडू पोलिसांच्या मदतीने गुरुवारी अटक केली आहे. ही माहिती जनसंपर्क अधिकारी विशाल धायगुडे यांनी शनिवारी दिली आहे.
चेन्नई स्थित तम्बरम शहरातील टी - १९ केलमबक्कम पोलीस ठाण्यातील हत्येच्या दाखल गुन्हयातील संशयीत आरोपीत रघू दूघई मंडऴ याचा तामिळनाडु पोलीस मागील ५ वर्षापासुन सातत्याने शोध घेत होते. आरोपीताच्या शोधार्थ तामिळनाडु पोलीसांना अनेक वेळा बिहार राज्यात शोध मोहिम राबविली होती. परंतु पोलीसांना आरोपीचा शोध घेण्यात यश येत नव्हते. गुरुवारी तामिळनाडू पोलीसांचे एक विशेष पथक आरोपीच्या शोधार्थ वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाले.
त्याअनुषंगाने वालीवचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी आरोपीचा शोध घेण्याचे अनुषंगाने तामिळनाडू पोलीसांकडून माहिती संकलीत केली. वालीव पोलिसांनी स्वत:चे खब-यांचे जाळे सक्रिय करुन बातमीदाराने दिलेल्या माहितीचे आधारे आरोपी रघु मंडल हा वसईतील एका बफिंग कंपनीमध्ये काम करीत असल्याची माहिती प्राप्त केली. तदनंतर, स्वत:च्या मित्राच्या खुनाच्या गुन्हातील आरोपीत रघु मंडल यास वालीव पोलीसांनी यशस्वीपणे ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले- श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार पाटील तसेच गुन्हे प्रकटिकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, अभिजीत गढरी यांनी पार पाडली आहे.
नेमकी काय होती घटना
आरोपी रघु मंडल व त्याचा मित्र अनिल चौधरी हे दोघे चेन्नईतील बफिंग कंपनीत एकत्र काम करुन एकाच रुममध्ये एकत्र वास्तव्यास होते. परंतु कालांतराने दोघांमध्ये किरकोळ कारणांवरुन वाद होऊन त्यांचे आपसात भांडण झाले. त्या भांडणाचा रघु मंडलने मनात राग धरुन १४ सप्टेंबर २०१८ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास एकाच रुममध्ये एकत्र झोपलेला असतांना रघु मंडलने अनिल चौधरी याचा धारदार चाकूने गळा कापून खुन केला होता. तद्नंतर, आरोपी अनिलचा मृतदेह असलेल्या रुमला बाहेरुन लॉक लावून पळून गेला. तामिळनाडू पोलीसांनी खुनाच्या गुन्हाचे तपासात आरोपीने केलेल्या गुन्हयाचे सीसीटीव्ही फूटेज प्राप्त केले होते.