वसईतील आनंद चार महिन्यांपासून अडकून पडला चीनच्या बंदरातील जहाजावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 12:05 AM2020-12-24T00:05:14+5:302020-12-24T00:05:33+5:30
Vasai : आनंद हा जहाजावर पाच महिन्यांच्या करारावर नोव्हेंबर २०१९ मध्ये कामावर रुजू झाला. त्यांचे जहाज ऑस्ट्रेलियातून कोळसा भरून चीनकडे रवाना झाले.
पारोळ : वसई तालुक्यातील वाघोली येथील आनंद फर्नांडिस चार महिन्यांपासून चीनमध्ये जहाजावर अडकून पडले आहेत. त्यामुळे ऐन नाताळ सणाच्या धामधुमीत फर्नांडिस कुटुंबाचे डोळे त्यांच्या वाटेकडे लागले आहेत. घरातील कर्तापुरुष परदेशात अडकल्याने नाताळ सणाच्या दिवसांत फर्नांडिस कुटुंबात चिंतेच्या वातावरण आहे. या जहाजावर एकूण ४० भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. यामुळे वसईत नाताळाची धामधूम सुरू असताना फर्नांडिस कुटुंबीयांवर मात्र चिंतेचे सावट पसरले आहे. सर्वच जण ताे केव्हा परतणार याकडे डाेळे लावून बसले आहेत.
आनंद हा जहाजावर पाच महिन्यांच्या करारावर नोव्हेंबर २०१९ मध्ये कामावर रुजू झाला. त्यांचे जहाज ऑस्ट्रेलियातून कोळसा भरून चीनकडे रवाना झाले. मात्र, कोरोना महामारीसाठी अमेरिकेने चीनला जबाबदार धरले. त्यांचे समर्थन ऑस्ट्रेलियाने केल्याने चीन व ऑस्ट्रेलिया या देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला. याचा फटका बसून हे जहाज काेफिडियन बंदरात पाेहाेचल्यावर या जहाजावरील काेणालाही बंदरात उतरू दिले नाही. या जहाजावर काम करणारे एकूण ४० भारतीय आहेत. त्यामध्ये वसईतील आनंद यांचा समावेश आहे. ऑगस्टपासून हे जहाज या बंदरात उभे असून चार महिन्यांत त्यांना जहाजाच्या खाली उतरता आलेले नाही. बंदरात उतरल्यास कारवाई करण्याची तंबी चीनने दिली आहे. आनंद यांची पत्नी, मुलगा, आई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत. नाताळाला ताे साेबत नाही भावनाच त्यांना सहन हाेत नाही.
वडिलांचे केंद्राला साकडे
केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन या जहाजावर असणाऱ्या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी आनंद यांचे वडील फ्रान्सिस फर्नांडिस यांनी केली आहे.