...अन् पाण्यातून वाट शोधत पोलीसमामा त्या चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 07:25 PM2018-07-11T19:25:48+5:302018-07-11T19:26:17+5:30
पोलीस कॉन्स्टेबल संतोष गीते यांनी सहा महिन्याच्या चिमुकलीचा वाचविला जीव
वसई - पोलिसांची प्रतिमा हि लाचखोर, हप्तेखोर, स्वतःचे खिसे भरणारी अशी डागाळलेली. मात्र, पालघर पोलिसांनी पावसाळ्यात नागरिकांना दिलेले अनेक मदतीचे हात हे पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन घडवून आणणारे आहे. गेले दोन दिवस संबंध पालघर जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता पोलिसांनी प्राण पणाला लावून अनेकांचे जीव वाचविले. आज सकाळी तर एक ट्वीटने सहा महिन्याच्या चिमुकलीचा जीव पोलीस कॉन्स्टेबल संतोष गीते यांनी रुग्णालयात वेळीच दाखल करून वाचविले आहेत.
पावसाचा हाहाकार तीन दिवस सुरूच होता.पाऊस उसंत घेत नव्हता आणि अशातच वसईच्या माणिकपूर भागातील ६ महिन्यांच्या चिमुकलीच्या वडिलांनी ट्विटरवरून पालघर पोलिसांची मदत मागितली. चिमुरडीचे वडील शरद झा यांनी ६ महिन्यांची चेत्सना आजारी असल्याने तिला रुग्णालयात नेणं गरजेचं असल्याचा मेसेज ट्वीटद्वारे पोलिसांना पाठवला. पोलीस प्रशासनाने तात्काळ हा मेसेज वसईच्या माणिकपूर पोलिसांना दिला. माणिकपूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल संतोष गिते यांनी एकही क्षण वाया न घालवता वडिलांनी दिलेल्या आयरिश बिल्डिंग, सनसिटी,वसई येथे रवाना झाले.
मात्र, इमारतीत जाणार कसं? इमारतीत पाणी भरलेलं अशा परिस्थितीतही कॉन्स्टेबल गिते चेत्सनाच्या घरी पोहोचले. त्यांनी सहा महिन्यांच्या चेत्सनाला खांद्यावर आपल्या मुलीप्रमाणे घेतलं आणि पाण्यातून वाट काढत सुखरूप बाहेर आणलं. पोलिसांच्या मदतीने चेत्सनाला आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पालघर पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हेमंत काटकर यांनी बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारात या चिमुरडीच्या वडिलांनी ट्विटवर पोलिसांशी संपर्क केला. तातडीने पोलीस कामाला लागले. कॉन्स्टेबल गितेंना या मुलीच्या घरी पाठवण्यात आलं. या मुलीला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं.” तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात कळवून आयरिश बिल्डिंग, सनसिटी, वसई येथे पोलीस कॉन्स्टेबल गिते यांना पाठवले होते, अशी माहिती दिली.
पोलीस अधीक्षकांची शाबासकीची थाप
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पूरस्थितीत ज्या पोलिसांनी चांगले मदतकार्य केले. त्यांच्या गौरव करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच विशेषतः कॉन्स्टेबल गीते यांचे कौतुक करत त्यांना शासनाच्या नियमानुसार प्रशस्तीपत्र आणि पैसे स्वरूपात बक्षीस देण्यात येईल आणि होऊ घातलेल्या अनेक पोलिसांच्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येईल असे सिंगे यांनी पुढे सांगितले.