...अन् विरार लोकल झाली १५० वर्षांची, चर्चगेट ते विरार प्रवास व्हायचा जलद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:11 AM2018-04-14T03:11:27+5:302018-04-14T03:11:27+5:30
- सुनील घरत
पारोळ : लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या विरार लोकल आता दीडशे वर्षाची झाली आहे. मात्र, या एतिहासीक दिवसाचा रोज प्रवास करणाऱ्या चारकरमान्यांना विसरपडलेला दिसत आहे. १२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती.
तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे ६ -४५ वाजता विरारहून सुटायची आणि सायंकाळी ५-३० वाजता तिच गाडी परतीचा प्रवास करायची. महिलांसाठी ट्रेनमध्ये वेगळा दुसºया श्रेणीचा डबा होता. या व्यतिरिक्त एक स्मोकिंग झोनही होता. त्याकाळी या ट्रेनमध्ये तीन श्रेणी होत्या. लोक सामान्यत: दुसºया श्रेणीने प्रवास करायचे.
प्रति मैलाचा दर होता ७ पैसे. तिसºया श्रेणीसाठी दर होता ३ पैसे. त्यावेळी चर्चगेट ते विरार हा प्रवास आज या प्रवासाला लागणाºया वेळापेक्षा कमी वेळात पूर्ण होत असे. कारण त्याकाळी अनेक स्थानके नव्हतीच. असणाºया स्थानकांची नावे नीअल (नालासोपारा), बसीन (आमची वसई), पाणजूू (वसईच्या दोन खाड्यामधले स्थानक), बेरेवाला (बोरीवली), पहाडी (गोरेगाव), अंदारु (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (बांद्रा), माहिम, दादुरे (दादर), ग्रांट रोड अशी होती. मात्र आजच्या दिवसापेक्षा रेल्वेच्या इतिहासात १६ एप्रिल १८५३ ला अधिक महत्त्व आहे. कारण या दिवशी ठाणे ते बोरीबंदर ट्रेन - देशातली पहिली ट्रेन - धावली होती. पण ती लोकल नव्हती. लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता अशी, माहिती परेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.
>या रेल्वेमार्गावर रोज लाखों प्रवासी प्रवास करतात, पण त्यापैकी अनेकांना आजचा दिवस माहित नसेल. हे दुर्भाग्यपूर्णच आहे. मध्य रेल्वेच्या तुलनेत या दिवसाचे महत्त्व रेल्वेच्या इतिहासात तसे कमीच आहे.
- ए. के. श्रीवास्तव, माजी मुख्य आॅपरेशन मॅनेजर, पश्चिम रेल्वे