वाकीपाड्यातील अंगणवाडी विद्यार्थ्यांचे शिक्षण उघड्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:51 PM2020-01-21T23:51:47+5:302020-01-21T23:53:43+5:30
सरकारी काम नि बारा महिने थांब अशा तत्त्वाने चालणारे सरकारी कर्मचारी, त्यांचा कारभार सर्वसामान्य जनतेच्या तळपायाची आग मस्तकात नेत आहेच.
पारोळ - सरकारी काम नि बारा महिने थांब अशा तत्त्वाने चालणारे सरकारी कर्मचारी, त्यांचा कारभार सर्वसामान्य जनतेच्या तळपायाची आग मस्तकात नेत आहेच. त्याचा प्रत्यय आता नायगाव पूर्वेतील वाकीपाडा येथे आला आहे. या ठिकाणी अंगणवाडी केंद्राच्या कामाला मागील तीन आठवड्यांपासून सुरुवात झाली आहे. मात्र कामात कोणतीही चपळाई नसल्याने त्याचा फटका लहानग्या विद्यार्थ्यांना बसत आहे.
अंगणवाडी केंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने येथील लहानग्या विद्यार्थ्यांना नजीकच्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या आवारात उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत असल्याचे चित्र दिसून येते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत.
नायगाव पूर्वेकडील वाकीपाडा येथे मुख्य रस्त्यालगत अंगणवाडी केंद्राच्या दुरुस्तीचे काम तीन आठवड्यांपासून संथगतीने सुरू आहे.
सदर काम जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील ४० विद्यार्थी सध्या नजीकच्या विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या आवारात उघड्यावर शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून मुलांना साध्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून न दिल्याने मुलांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. अंगणवाडी सेविका आपल्या घरातील पिण्याचे पाणी मुलांना आणून देतात. तर शौचालयासाठी त्यांच्या घरातील बाथरूमचा वापर केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या ढिसाळ कारभाराबाबत पालकवर्गामध्ये नाराजीचे वातावरण आहे. याबाबत काही ना काही कार्यवाही लवकर करण्याची मागणी होते आहे.
उघड्यावर कुडकुडत विद्यार्थी घेतात शिक्षण
सध्या थंडीचे दिवस असल्याने उघड्यावर कुडकुडत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. अशा वेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडून अंगणवाडी केंद्राचे काम तात्काळ मार्गी लावून लहानग्या विद्यार्थ्यांची होणारी परवड थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी पालकवर्गामधून होत आहे.
अंगणवाडीसाठी अंगणवाडी सेविकेचे सासरे कै. हरिश्चंद्र विठ्ठल पाटील यांनी आपल्या मालकीची जागा दिली आहे. जागा तर मिळाली, आता या अंगणवाडीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी पालकांची मागणी आहे.