वसईमध्ये लस न मिळाल्याने संताप! सोमवारी लसीकरण बंद राहिल्याने नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 09:01 AM2021-05-11T09:01:34+5:302021-05-11T09:09:58+5:30
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना दुसरीकडे लसीकरणाच्या नावाने महापालिकेची बोंबाबोंब सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
पारोळ : वसई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, दररोज शहरी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण समोर येत आहेत. सध्या वसई तालुक्यातील रुग्णसंख्या ६० हजारांच्या वर गेली असून, यात १ हजार २०७ नागरिकांचा बळी गेला आहे. ४८ हजारांच्या वर बरे झाले असले तरी आज ११ हजारहून जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. असे असताना कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. मात्र लसींअभावी सोमवारी लसीकरण बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. जर लसीकरणाला ब्रेक लागला तर कोरोना प्रादुर्भाव रोखणार कसा, असा प्रश्न विचारला जात आहे.
वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना दुसरीकडे लसीकरणाच्या नावाने महापालिकेची बोंबाबोंब सुरूच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. वसई-विरारमधील लसीचा साठा संपल्याने लसीकरण मंदावले होते. रविवारी उशिरा लसींचा साठा वसई-विरारमध्ये दाखल झाला आहे. मात्र लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतील आणि कोरोना नियमांचे उल्लंघन होईल, अशी भीती असल्याने सोमवारी महापालिकेकडून लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक जण लसीकरणाविनाच घरी परतले. वसई तालुका हा शहरी व ग्रामीण भागात विभागला असल्याने महापालिका क्षेत्रातील लसीकरण हे मंगळवारी सुरू होणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
वसई ग्रामीण भागात बुधवारी लसीकरण सुरू होईल, अशी तालुका आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली. शहरी भागात आरोग्य विभाग प्रथम प्राधान्य देत असल्याने ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर डोसही कमी येतात. काहीवेळा आठवड्यात एका दिवशी लसीकरण होत असते. त्यात डोस कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. या कोरोना लाटेचा गावातसुद्धा प्रादुर्भाव वाढल्याने लसीकरणाचा वेग ब्रेक न लागता वाढवण्याची गरज आहे. महापालिका क्षेत्रात १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण तीन केंद्रांवर सुरू झाले असून, याचा लाभ खासगी कार्यालयात नोकरी करणाऱ्यांना होत आहे, तर ग्रामीण भागात या वयोगटातील लसीकरण सुरू न झाल्याने तरुणांना लसीकरणाला मुकावे लागत आहे.