नाराजांना आधार संघर्ष समितीचा
By admin | Published: June 19, 2017 03:39 AM2017-06-19T03:39:52+5:302017-06-19T03:39:52+5:30
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत विविध पक्षात प्रामुख्याने भाजपात इच्छुकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे उमेदवारी वाटपावेळी स्थानिक नेतृत्वाची कोंडी होणार आहे.
राजू काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत विविध पक्षात प्रामुख्याने भाजपात इच्छुकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे उमेदवारी वाटपावेळी स्थानिक नेतृत्वाची कोंडी होणार आहे. यात ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही त्या नाराजांना निवडणूक लढवण्यासाठी मीरा-भार्इंदर संघर्ष समितीचा आधार मिळणार आहे. समितीत शहरातील अनेक दिग्गजांचा समावेश असल्याने निवडणुकीत तिचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपातील इच्छुकांची मांदियाळी पाहता सर्वांनाच तिकीट देता येणार नसल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आयारामांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात दिले होते. त्यांनी आयाराम इच्छुकांना तर सबुरीचा सल्ला देत विजय गृहीत धरून सत्तेत सामावून घेणार असल्याचा दिलासाही दिला. यावरून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी भाजपात इच्छुकांच्या रांगा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी उमेदवारीसाठी तरूण चेहऱ्यांना पसंती देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पक्षातील ज्येष्ठांना आपसुकच डावलण्यात येणार असल्याचे संकेतही मिळू लागले आहेत. पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये मेहता यांच्या निर्णयामुळे नाराजी पसरली आहे.
मेहता यांना शह देण्यासाठी क्रांतीकारी संघटनेने सर्व पक्षांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर भाजपाने अंतर्गत खेळी करून भारतीय संग्राम परिषदेला निवडणुकीत उरण्यास भाग पाडले आहे. परिषदेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी तर येत्या निवडणुकीत भाजपाने प्रतिसाद दिल्यास त्यांच्यासोबत लढणार असल्याचे स्पष्ट करुन भाजपा विरोधातील पक्षांपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपासह शिवसेना-भाजपात इनकमिंग केलेल्यांना उमेदवारीची वाट खडतर असल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे काहींनी तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून तसा प्रचारही त्यांनी सुरू केला आहे. यात शिवसेना व भाजपाच्या नाराजांचा समावेश आहे. निवडणुकीची धामधूम अद्याप सुरू झाली नसल्याने अनेक इच्छुकांनी तूर्तास पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी वाटपाला सुरूवात झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नाराजांची गळती सुरू होणार आहे. या नाराजांना उमेदवारीचा आधार देण्यासाठी मीरा-भार्इंदर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
ही समितीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असून त्याचे नेतृत्व शहरातील अनेक दिग्गजांकडून केले जाणार आहे. त्यात जनता दलाचे माजी नगरसेवक मिलन म्हात्रे, पालिकेचे माजी आयुक्त शिवमूर्ती नाईक, भाजपाचे माजी नगरसेवक व ज्येष्ठ पदाधिकारी ओमप्रकाश गाडोदिया आदींचा समावेश आहे. या समितीची रविवारी मुहूर्तमेढ रोवली जाण्याची शक्यता असे सूत्रांकडून सांगण्यात आले.