रुग्णांसाठी ठरतोय देवदूत, आदिवासींचा अवलिया समीर कोयलेवाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 06:13 AM2018-11-11T06:13:51+5:302018-11-11T06:14:54+5:30
रुग्णांसाठी ठरला देवदूत : अनेक गर्भवतींना पोहोचविले रुग्णालयात सुखरुप
हुसेन मेमन
जव्हार : पालघर जिल्ह्यातील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील ४३ कि.मी. अंतरावर असलेल्या दाभेरी गावातील समीर कोयलेवाला उर्फ सम्या हा जीपचालक शेकडो रुग्णांसाठी व गर्भवती मातांसाठी देवदूत ठरला आहे.
या गावात राहणारा तरुण जीपचालक समीर कोयलेवाला याची ‘सम्या’ या नावाने ओळख असून, त्याचे कुटुंब गेल्या ७० ते ८० वर्षांपासून गावात राहत आहे. त्याचे लहानसे किराणा दुकान असून, तो रोज दाभेरी ते जव्हार या मार्गावर काळीपिवळी जीप चालवून उदरिनर्वाह करीत आहे. मात्र त्याने त्याच्या जीपचा वापर करून रुग्णालयात नेऊन शेकडो रुगणांचे प्राण वाचविले आहेत.
हे गावं सिल्वासा व गुजरात राज्याला लागून हद्दीवर आहे. त्यामुळे या परिसरात रस्ते, आरोग्यच्या सुविधांची वानवा आहे. दिवसातून दोन वेळा एसटी बस येते. ती ही बेभरवशी प्राथमिक आरोग्यकेंद्र गावापासून ३५ कि.मी दूर आहे. त्यामुळे रुग्णांना व गर्भवतींना रुग्णालयात न्यायचे कसे? हा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. मात्र तेव्हा रुग्णांना हॉस्पिटमध्ये नेण्यास धाव घेतो तो ‘सम्या’ त्याला रात्री-बेरात्री कधीही सांगा तो तयारच असतो. त्या रुग्णांजवळ पैसे असोत कि नसोत त्याला तो हॉस्पिटलमध्ये पोहोचविणारच त्यामुळे त्याच्या कामाचे परिसरातून कौतूक केले जात आहे.
तो गेल्या १० वर्षापासून जीप चालवत आहे. मात्र एका वर्षात अडलेल्या ५७८ गर्भवतींना त्याने आपल्या जीपमध्यून रुग्णालयात दाखल केले आहे व त्यांच्या प्रसूतीस हातभार लावला आहे. गोरगरिब लोकांसाठी त्याने त्याच्या जीपचा अॅम्ब्युलन्ससारखा वापर केला आहे. केवळ रुग्ण आणि गर्भवती मातांसाठीच त्याने हा मदतीचा हात दिला नसून जव्हार व सिल्व्हासा येथील रुग्णालयातून २४ मृतदेहांची घरापर्यंत वाहतूकही केली आहे. तसेच पावसाळ्यात रुग्णांना गॅस्ट्रो, झाडा, हिवताप किंवा सर्प दंश झालेल्या रुगणांची वाहतूक तो नेहमीच करीत असतो. स्वत: श्रीमंत नसतांनाही व परीवाराचे पोट हातावर असतांनाही गरीबांच्या मदतीसाठी खिशाला खार लावून घेणाऱ्या समीरला त्यामुळे तालुक्यातील जनता अवलीया मानते आहे. जेवढे जमेल तेवढे समाजासाठी करावे ते अल्लाच्या चरणी रुजू होते. अशा श्रद्धेने तो हे कार्य वर्षानुवर्षे निस्वार्थपणे करीत आहे.
‘दुख और दर्द का कोई मजहब नही होता’ अशा भावनेतून मी हे कार्य करतो त्यातून मला खूप समाधान लाभते. अत्यवस्थ स्थितीत मी रुग्णालयात ज्याला दाखल केले. तो जेव्हा ठणठणीत बरा झालेला मी पाहतो. तेव्हा मला होणारा आनंद हा खूप मोठा असतो. त्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.
- अवलिया समीर कोयलेवाला, दाभेरी