वनगापाड्यात पशुपालन प्रशिक्षण शिबिर
By Admin | Published: March 17, 2017 05:47 AM2017-03-17T05:47:14+5:302017-03-17T05:47:14+5:30
तलासरी पंचायत समितीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विद्यमानाने कवाडा वनगपाडा येथील शिवारात शेतकरी व पशुपालन प्रशिक्षण शिबिर
तलासरी : तलासरी पंचायत समितीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विद्यमानाने कवाडा वनगपाडा येथील शिवारात शेतकरी व पशुपालन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी खासदार चिंतामण वनगा, आ. पास्कल धनारे, सभापती वनश्या दुमाडा, जिल्हा व तालुका पंचायत व जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी राहुल धूम, कृषी व पशुसंवर्धन अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालघर सरस कार्यक्रमात स्टॉल मांडलेल्या प्रगत शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शासनाच्या कुक्कुट, शेळी पालन, शेत तळे, मत्स्य शेती अशा योजनांची माहिती देण्यात आली. भात शेती बरोबर फळे पालेभाज्या याची लागवड करून कुक्कुट, शेळी, मत्स्य पालन दुग्ध व्यवसाय केल्यास कुटुंबाचा विकास करता येईल यासाठी मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन केले. प्रशिक्षण शिबिरात दुभती जनावरे, कुक्कुट पालन करताना येणारे रोग , घ्यावयाची काळजी, औषधे, शेतीसाठी लागणारी औषधे, फळ पालेभाज्यांवर होणारा प्रादुर्भाव आवश्यक कीटकनाशके यांची माहिती देण्यात आली. दोन दिवसाच्या शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतला. त्यांच्या ज्ञानात भर पडून रब्बी व हंगामी पीक वाढीस मदत होणार आहे. (वार्ताहर)