भाताबरोबर जनावरांचा चाराही झाला खराब; शेतकरी सापडला दुहेरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 10:52 PM2019-10-26T22:52:14+5:302019-10-26T22:52:26+5:30
वाडा येथील परिस्थिती : करपे भिजल्याने तरंगू लागली
वाडा : वाडा तालुक्यात परतीच्या पावसाने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठवडाभर परतीचा पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भातपीक पावसामुळे शेतातच असल्याने कोंब आले आहेत. तर पेंढाही काळाभोर पडला असून तो जनावरांना खाण्यास योग्य राहिला नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक पडला असल्याने उत्पन्न चांगले आहे. भातपीक सोन्यासारखे चमकत होते. मात्र परतीच्या पावसाने या पिकाचे नुकसान झाले. दहा दिवसांपूर्वी कडक ऊन पडल्याने शेतकऱ्यांनी जव्हार, मोखाडा येथून मजूर आणून भाताची कापणी सुरू केली होती. कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता परतीच्या पावसाने सुरूवात केली तो आठ ते दहा दिवस पडतच राहिला. पावसाने करपे भिजली असून काही ठिकाणी ती तरंगू लागली आहेत.
भाताचे दाणे परिपक्व असल्याने या दाण्यांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत. भात तर खराब झालाच पण जनावरांचा पेंढाही काळाभोर पडला असून तो जनावरांना खाण्यास योग्य राहिला नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वी पाऊस गेल्याने भातपिकांचे नुकसान झाले होते. तर यावर्षी परतीच्या पावसाने भातपिकांचे नुकसान झाले आहे.
भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे उद्यापासून सुरू करणार आहोत. - माधव हासे, तालुका कृषी अधिकारी