एैना, घानवळ आश्रमशाळा स्थलांतरीत
By admin | Published: July 5, 2017 05:59 AM2017-07-05T05:59:28+5:302017-07-05T05:59:28+5:30
मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये
हुसेन मेमन/लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : मोखाडा तालुक्यातील घानवळ व जव्हार तालुक्यातील एैना या दोन आश्रमशाळा सोमावारी स्थलांतरीत करण्यात आल्या आहेत, यामध्ये घानवळ ही आश्रमशाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळेत स्थलांतरीत करण्यात आली तर एैना ही आश्रमशाळा विक्रमगड तालुक्यातील जुनी साखरे येथे स्थलांतरीत करण्यात आली आहे.
एैना ही शाळा जव्हार तालुक्यातील वादग्रस्त शाळा म्हणून ओळखली जात होती, दरी खोऱ्यातील शेवटच्या टोकाची नॉट रिचेबल अशी होती. कारण कोठल्याही कंपनीचे मोबाईल तथा दूरध्वनी येथे चालत नाहीत, शाळाही भाड्याच्या कुजक्या खोलीत भरत होती, ही प्राथमिक शाळा असून इ. १ ली ते ७ वी पर्यतचे एकूण १९० विद्यार्थी शिकत होते, त्यातील ९२ विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाने एस.टी.बस द्वारे साखरे येथे पोहोचविले .
एैना येथील शाळा हलवू नये म्हणून गावकऱ्यांनी भरपूर प्रयत्न केले, शाळा हलवू नये असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला, तसेच काही दिवसापुर्वी माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत व कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष केदार काळे यांनी ही शाळा हलवू नये यासाठी कार्यालयावर मोर्चा काढला होतो, मात्र तेथे असणाऱ्या असुविधा तसेच राहण्यापासून ते खाण्यापर्यतच्या येण्या-जाण्याच्या समस्याचा पालकांना व विद्यार्थ्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन जव्हार प्रकल्पाच्या अधिकारी पवनीत कौर यांनी ही शाळा स्थलांतरीत करण्याकरीता प्रयत्न सुरू केले होते, मात्र काही ग्रामस्थांचा तर स्थानिक राजकिय नेत्यांचा त्याला विरोध होत होता, त्यामुळे अखेर स्थलांतराची बाब गोपनिय ठेऊन जव्हार पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या मदतीने बंदोबस्तात शाळा स्थलांतर करण्यात आली, यावेळी स्थानिक महिलांनी काही वेळ रस्ता अडवून धरला मात्र आढव यांनी महिलांना ताब्यात घेऊन रस्ता मोकळा करून शाळा साखरा येथे सुखरूप हलविण्यात यश मिळविला.
तसेच घानवळ शाळा ही मोखाडा तालुक्यातील शेवटच्या गावातील तुटकी फुटकी शाळा असून भाड्याच्या खोलीत भरत होती, तेथे जाण्या येण्याकरीता रस्तेही नव्हते, जंगलातील शेवटच्या टोकाची शाळा असल्यामुळे तेथेही विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना समोर जावे लागत होते. १ ली ते ७ वीचे े २०३ विद्यार्थी तीमध्ये शिक्षण घेत होते. ती ही शाळा मोखाडा तालुक्यातील जुनी गोंदे आश्रमशाळा येथे शासकिय ईमारतीत स्थलांतर करण्यात आली.,
स्थलांतरण आवश्यकच होते : घानवळ येथून विद्यार्थ्यांना गोंदे शाळे पर्यत नेण्याकरीता कार्यालयाने काहीच सोय न केल्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत आणले. त्यात २०३ विद्यार्थ्यांपैकी पहिल्या दिवशी ४५ मुली व ३० मुले अशी एकूण ७५ विद्यार्थ्यांनी शाळेत नावे नोंदविली तसेच गोंदे व साखरे येथे नविन शाळा व वसतीगृहाची इमारात बांधण्यात आलेली असून दोन्ही जुनी व नवीन शाळा समोर समोर असल्यामुळे मुलींच्या निवासाची सोयही नविन वसतीगृहात करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे कर्मचारी सुतार यांनी लोकमतला दिली.शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते, एैना शाळा ही खूपच लांब व दऱ्या खोऱ्यातील शाळा होती तेथे विद्यार्थ्यांना खुपच त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे शाळा स्थलांतर करणे गरजेचे होते.