बॉम्बस्फोटाचे निनावी पत्र... अन एकच गोंधळ
By admin | Published: November 7, 2015 12:15 AM2015-11-07T00:15:58+5:302015-11-07T00:15:58+5:30
पालघर-माहीम रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेसमोर भरणाऱ्या शुक्रवारच्या बाजारात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी पत्रामुळे सगळी यंत्रणा कामाला लागली
पालघर : पालघर-माहीम रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेसमोर भरणाऱ्या शुक्रवारच्या बाजारात बॉम्बस्फोट होणार असल्याच्या निनावी पत्रामुळे सगळी यंत्रणा कामाला लागली आणि सरतेशेवटी ही धमकी खोटी असल्याचे तपासात उघड झाल्यानंतरच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. हे पत्र आले आणि बॉम्बशोधक पथक, दहशतवादविरोधी पथकाने बँकेसमोरील सर्व भाग सकाळपासून ताब्यात घेत तपासणी केली. या वेळी दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या हजारो ग्राहकांची पूर्ण काळजी घेत ही मोहीम यशस्वीपणे राबविली.
पालघर तालुक्यातील सर्वात मोठा आठवडाबाजार म्हणून पालघरचा आठवडाबाजार ओळखला जातो. कपडे, मसाले, धान्य, मासे इ. बहुतांशी जीवनावश्यक वस्तू या बाजारपेठेत मिळत असल्याने तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी येत असतात. तसेच औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनाही सुटी असल्यानेही दिवाळीच्या खरेदीसाठी कामगारवर्गाची मोठी गर्दी असते. या गर्दीमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी सलीम सुलेमाननामक व्यक्तीने पालघर जिल्हा अधीक्षक कार्यालयात निनावी पत्र लिहून शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास या आठवडाबाजारातील क्रॉकरीची विक्री करणाऱ्या दुकानाजवळ बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याचे कळविले होते. या अनुषंगाने सकाळी ८ वा. ठाणे बॉम्बशोधक पथक, दहशतवादविरोधी पथक, पालघर पोलिसांनी पोलीस अधीक्षिका शारदा राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक भगवान यशोद, जयंत बजबळे यांच्या सूचनेनुसार बँकेसमोरील सर्व विक्रेत्यांच्या दुकानांचा ताबा घेतला. बॉम्बशोधक पथकातील ‘बिजली’ या कुत्रीने संशयित सर्व भाग हुंगून काढल्यानंतर कुठेही बॉम्ब नसल्याचे दर्शविल्याचे दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी एस.एन. यमगर यांनी लोकमतला सांगितले. त्यानंतर ११ वा. पुन्हा बाजार पूर्ववत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. निनावी पत्रामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला असला तरी क्रॉकरी विक्रेत्या दुकानदारांच्या वैमनस्यातून हा निनावी पत्राचा खटाटोप केला तर नसावा ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)