कोलाची दुसरीही लाइन मंजूर
By admin | Published: May 22, 2016 01:25 AM2016-05-22T01:25:30+5:302016-05-22T01:25:30+5:30
तालुक्यातील जनता पाणीटंचाईने हैराण झालेली असतांना कुडूस येथील हिंदुस्थान कोकाकोला कंपनीला पाणीपुरवठा वाढविण्यासाठी दुसरी पाईपलाईन टाकण्यास मंजुरी
वसंत भोईर, वाडा
तालुक्यातील जनता पाणीटंचाईने हैराण झालेली असतांना कुडूस येथील हिंदुस्थान कोकाकोला कंपनीला पाणीपुरवठा वाढविण्यासाठी दुसरी पाईपलाईन टाकण्यास मंजुरी देऊन सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळले आहे. शीतपेयाची निर्मिती करण्यासाठी हिंदुस्थान कोकाकोला कंपनीला सरकार दररोज लक्षावधी लिटरचा पाणी पुरवठा वैतरणेतून करीत आहे, आणि त्याच वेळी भूमीपूत्रांच्या नशिबी मात्र भीषण पाणी टंचाई लादत आहे. या कंपनीचा हा पाणीपुरवठा त्वरीत बंद करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ,मनसे, बविआ, कुणबीसेना यांच्यासह असंख्य भुमिपूत्रांनी केली आहे. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांना धुडकावून कंपनीला नवीन पाइपलाइन टाकण्याची परवानगी दिल्याने संताप व्यक्त होत असून सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. या कंपनीला जिल्हाधिकारी आणि जलसंपदाचा आशिर्वाद असल्याचीही चर्चा आहे.
अशियात सर्वात मोठा प्रकल्प
कुडूस येथील कंपनीचा हा आशिया खंडातील सर्वात मोठा शीतपेय उत्पादन करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या उत्पादनाकरीता ही कंपनी प्रचंड पाणी साठा उपसत आहे. त्यामुळे वाडा तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासनाने गंभीर दखल घेऊन हा पाणी उपसा तात्काळ बंद करावा. अन्यथा ही पाइपलाइन तोडू असे प्रशासनाला येथील भूमीपुत्रांनी बजावले आहे.काम बंद पाडले
वाडा पश्चिम विभागाचे वनपाल टी.एल. लंगडे यांनी सांगितले की, वनविभागाची परवानगी घेतलेली नसल्याने वन हद्दीतील काम आम्ही बंद केले आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अरविंद कापडणीस यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.नेत्याला कामाचा ठेका
पालघर जिल्हापरिषदेच्या एका गटनेत्याला कोकाकोलाची नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाचा ठेका दिल्याने जिल्हा परिषदेच्या परवानग्या मिळाल्याची चर्चा रंगली आहे. इतर नेत्यांचाही सहभाग असल्याने कोकाकोलाच्या नवीन पाइप लाईनला विरोध झालाच नाही.