शेतकरीविरोधी कायद्याचा पालघरमध्ये सर्वत्र निषेध; वाड्यात भाजपाविरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:19 AM2020-12-04T00:19:19+5:302020-12-04T00:19:31+5:30
शेतकऱ्यांविरोधात असलेले विधेयक व इतर बाबींचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
जव्हार : भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून जव्हारमध्ये तहसील कार्यालयासमोर गुरुवारी आंदोलन करण्यात आले. सहा महिने पुरेल इतका शिधा सोबत घेऊन शेतकरी आंदोलनाला उतरले आहेत. शेतकरीविरोधी विधेयकाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देऊन जव्हार शहरात गोरवाडीनाका येथे रास्ता रोको करून आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जव्हार तहसीलदार संतोष शिंदे यांच्याकडे देण्यात आले.
शेतकऱ्यांविरोधात असलेले विधेयक व इतर बाबींचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. ३० जुलै २०२० रोजी राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीतील विषयानुसार २,९४६ वनहक्क दावे निकाली काढून चार हेक्टर वनजमीन कसणाऱ्याच्या नावे करून वनपट्टेधारकांना ७/१२ व ८ अ नुसार जमिनी नावावर करा, संभाव्य वीजबिल विधेयक मागे घ्या, कोरोनाकाळात प्रत्येक गरजू कुटुंबाला दरमहा ७५०० रुपयांची थेट मदत केंद्र सरकारमार्फत मिळावी, आदी मागण्या केल्या.
केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांविरोधात आणलेल्या विधेयकाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने खंडेश्वरीनाका येथे निदर्शने करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारचे जुलमी व हुकूमशाही असलेले शेतकरीविरोधी विधेयक रद्द करण्यासाठी तसेच दिल्लीच्या सीमेवर या विधेयकाला विरोधात लढा देत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ही निदर्शने करत असल्याचे किसान काँग्रेस संघाचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी सांगितले. वाडा येथील खंडेश्वरीनाका येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर चौधरी, तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष लोकेश पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष मुद्दसर पटेल आदी उपस्थित होते.