चिकू फळांवर रोगांच्या प्रादुर्भावाने चिंता; शेतीशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 01:00 AM2020-10-17T01:00:34+5:302020-10-17T01:00:51+5:30
डहाणूमध्ये शेतकऱ्यांसाठी वर्षभर व्यवस्थापन वर्ग घेणार
बोर्डी : डहाणू तालुक्यात चिकू हे प्रमुख फळबागायती पीक आहे. मात्र दिवसेंदिवस फळांना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन शेतकरी हवालदिल झाला आहे. याकरिता तालुका कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड यांनी ‘चिकू कीड रोग व्यवस्थापन’ याविषयी कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील घोलवड-डहाणूला चिकू भौगोलिक मानांकन मिळाले आहे. या पिकाची जिल्ह्यातील एकूण लागवड १० हजार हेक्टर असून डहाणू तालुक्यातील क्षेत्र ६ हजार हेक्टर आहे. येथील युवा सुशिक्षित या क्षेत्राकडे वळला आहे. परंतु मागील काही वर्षांत या फळावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनावर परिणाम होऊन बागायतदार हवालदिल झाला आहे.
या रोगावर उपाययोजनेकरिता तालुका कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्यातर्फे चिकू कीड रोग व्यवस्थापन हा संयुक्त कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार सरावली, पाटीलपाडा येथे या उपक्रमाचा पहिला कार्यक्रम १४ ऑक्टोबर रोजी शंकर डोंगरकर यांच्या चिकू बागेत घेण्यात आला. या वेळी कार्यशाळेला मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी या फळावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. मंडळ कृषी अधिकारी सुनील बोरसे यांनी चिकूमधील महत्त्वाच्या समस्या तसेच विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले.
चिकू रोग, किडी, खत व पाणी व्यवस्थापन तसेच माती परीक्षणाची गरज आदी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी केले. प्रत्येक महिन्याला एक वर्ग अशा प्रकारे वर्षभर हा शेती शाळेचा उपक्रम राबविला जाणार असल्याचे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन कृषी सहायक विशाल नाईक यांनी केले.