आर्थिकगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:34 PM2020-02-16T23:34:48+5:302020-02-16T23:35:08+5:30

सातवी गणना : घरोघरी भेट देणार प्रगणक

Appeal to co-workers for economic calculation | आर्थिकगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

आर्थिकगणनेसाठी प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन

Next

पालघर : केंद्र शासनाच्या सांख्यिकी तसेच कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या गणनेसाठी प्रगणकांना सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व उद्योग व्यवसाय व सेवा यांची प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कुटुंबाची व उद्योगांना भेटी देऊन गणना करण्यात येणार असून ही माहिती संकलनाच्या ‘सामाजिक सेवा केंद्र’ या संस्थेची नियुक्ती शासनाने केली आहे. माहिती संकलित करणाऱ्या पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रथमत: पूर्णपणे पेपरलेस गणना मोबाईल टॅबचा वापर करून करण्यात येणार आहे. सदर गणनेचे क्षेत्रीय काम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी प्रगणकांना ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी सांगितले.
पहिली आर्थिक गणना १८७७, दुसरी १९८०, तिसरी १९९०, चौथी १९९७, पाचवी २००५, तर सहावी आर्थिक गणना २०१३ या वर्षी झालेल्या आहेत. या गणनेचा उपयोग प्रामुख्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकरिता धोरण तयार करणे तसेच स्थानिक पातळीवर नियोजन करण्याकरिता होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनाही माहिती फायदेशीर ठरते. या गणनेमध्ये कुटुंबातील व्यक्ती किती? कुटुंबातील किती सदस्य नोकरी करतात? किती व्यवसाय करतात? घरात उद्योग, व्यवसाय केला जातोय का? या संदर्भात माहिती गोळा केली जाणार आहे. एखाद्या घरी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ भाडेकरू असल्यास त्याबाबतची नोंद केली जाणार आहे. याशिवाय आॅटोरिक्षा, भाजीविक्रेते, फेरीवाले, चायनीज गाड्या यांचीही नोंद केली जाणार आहे. या गणनेमध्ये पिकांचे उत्पादन, वृक्षारोपण, बेकायदेशीर आर्थिक घडामोडी, सार्वजनिक प्रशासन व संरक्षण संस्था, निमलष्करी संस्था आणि बाह्य प्रादेशिक संस्थांच्या आर्थिक घडामोडी इत्यादी बाबी वगळण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्तरावर माहिती गोपनीय राहणार आहे.

माहिती देणे बंधनकारक
आर्थिक गणनेचे काम केंद्रातर्फे सांख्यिकी संग्रहण अधिनियम २००८ अन्वये हाती घेण्यात आले असून या अधिनियमानुसार सर्व आस्थापना व कुटुंबांना माहिती देणे बंधनकारक आहे. गणना सुरू असताना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामांतर्गत कुटुंबाने किंवा आस्थापनाने चुकीची किंवा माहिती देण्यास नकार दिल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे. त्यामुळे सर्व संबंधितांनी अचूकपणे माहिती देऊन मोहिमेत सहभागी व्हावे. नागरिकांनी माहिती देऊन गणनेचे काम व्यवस्थित होण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.शिंदे यांनी केले.

Web Title: Appeal to co-workers for economic calculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.