पालघरात असंघटीत कामगारांना पेन्शन लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:20 AM2019-03-06T00:20:29+5:302019-03-06T00:20:33+5:30
जिल्ह्यातील सर्व असंघटीत कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार
पालघर : जिल्ह्यातील सर्व असंघटीत कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून वयाच्या साठाव्या वर्षानंतर कमीतकमी तीन हजार रुपये पेन्शन मिळणार असून यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होणार आहे. अनेक योजनांपासून वंचित असणाऱ्या या असंघटीतांना न्याय मिळवून देण्याचा संघटीतपणे प्रयत्न करू असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
जिल्ह्यात तारापूर एमआयडीसी, पालघरमधील बिडको आदी वसाहती, वाडा, विक्रमगड, डहाणू, वसई, तलासरी आदी भागातील कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात असंघटीत कामगार आहेत. जिल्ह्याला २५ हजार असंघटीत कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यातील ५ हजार ५०० कामगारांची नोंदणी करण्यात आली असली तरी आम्ही आपले उद्दिष्ट वेळीच पूर्ण करू असा आशावाद उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी प्रस्ताविकेतून व्यक्त केला. एमआयडीसी कारखान्यातून कामगारांची नोंदणी करण्याबाबत तारापूरच्या कामगार उपायुक्तांकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटीत कामगारांच्या आयुष्यात दूरगामी परिणाम करणारी योजना असल्याचे सांगून कामगारांच्या पगारातील थोड्या रक्कमेत राज्यशासनाचाही वाटा समविष्ट करून तिचा फायदा त्यांना मिळून त्यांचा वृद्धापकाळ सुखावह होईल असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले.
रिक्षा चालक, फेरीवाले, मिड-डे मील कामगार, माथाडी कामगार, शेती मजूर, घर कामगार इत्यादीना अनेक आर्थिक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. या १८ ते ४० वयोगटातील १५ हजारापेक्षा कमी मासिक वेतन असणाऱ्या असंघटीत कामगारांना योग्यवेळी पेन्शन मिळाल्याने त्यांना मोठा आधार मिळणार आहे असे बोरीकर यांनी यावेळी सांगतिले. यावेळी प्रासंगिक स्वरुपात जिल्ह्यातील निवडक लाभार्थींना त्यांचे नोंदणी पत्र देण्यात आले.