अन्नदिन साजरा करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती; शिक्षकसेनेचा तीव्र विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 02:04 AM2019-12-09T02:04:33+5:302019-12-09T02:04:50+5:30
प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणाºया अशैक्षणिक कामांची नेहमीच चर्चा होत असते.
वाडा : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना दिल्या जाणाºया अशैक्षणिक कामांमुळे राज्यातील शिक्षकांमध्ये अगोदरच नाराजीचे वातावरण असताना पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना अन्नदिन साजरा करण्यासाठी नियुक्ती आदेश दिल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, शिक्षक सेनेने या कामाला विरोध केला आहे.
प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणाºया अशैक्षणिक कामांची नेहमीच चर्चा होत असते. निवडणूक, मतदारयादी, जनगणना, स्वच्छता अभियान यांसारखी अनेक शाळाबाह्य कामे करताना तारेवरची कसरत करून शिक्षकांना आपले दैनंदिन अध्यापन करावे लागते. त्यातच पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अन्नदिन साजरा करण्यासाठी जुंपल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, प्रत्येक गावातील रेशन दुकानात दरमहा सात तारखेला अन्नदिन साजरा करावयाचा असून सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी धान्य वाटप केले जाणार आहे. या दिवशी शिक्षकांनी आपली शाळा सोडून नियुक्ती दिलेल्या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत थांबून हे धान्य वाटप करावयाचे आहे. या कामासाठी अनेक महिला शिक्षिकांना सुद्धा आपली शाळा सोडून दूरच्या गावांमध्ये नियुक्ती दिली गेली आहे. या कामामुळे काही ठिकाणी शिक्षक व रेशन दुकानदार यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असताना, या शाळाबाह्य कामासाठी आपली मुले वाºयावर सोडून जावे लागणार असल्याने शिक्षक चिंतेत आहेत.