उत्कृष्ट कामगिरी करत गुन्ह्यांची उकल करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 07:56 PM2023-02-18T19:56:06+5:302023-02-18T19:56:19+5:30
पोलीस आयुक्तालयात दरमहा आयुक्तालयातील हद्दी मध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा मासिक आढावा बैठकीत घेतला जातो .
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडेय यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी करत गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार दरमहा घेतल्या जाणाऱ्या मासिक गुन्हे आढावा बैठकी वेळी करण्यात आला .
पोलीस आयुक्तालयात दरमहा आयुक्तालयातील हद्दी मध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांचा मासिक आढावा बैठकीत घेतला जातो . त्या बैठकीत मागील महिन्यात महत्वाच्या अश्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार केला जातो . जानेवारी महिन्यात बनावट विमा पॉलिसी चे आंतराज्य रॅकेट उघडकीस आणणाऱ्या सायबर शाखेचे निरीक्षक सुजितकुमार गुंजकर व त्यांच्या पथकास गुन्ह्याची उत्कृष्ट उकल क्रमांक १ ने प्रशस्तीपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले . गुंजकर व पथकाने विमा कंपनीतील कर्मचाऱ्यासह ४ आरोपीना अटक करून मोठ्या प्रमाणात मोबाईल आदी जप्त केले . ह्यात अनेकांची बनावट पॉलिसी देऊन फसवणूक केली गेली आहे .
क्षुल्लक वादातून मीरारोड मध्ये अंकुश राज ह्याची हत्या करणाऱ्या ९ आरोपीना काही तासात अटक करून मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे अविराज कुराडे तसेच मीरारोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल आणि पोलीस पथकास विशेष रिवॉर्ड १ ने सन्मानित करण्यात आले .
उत्कृष्ट गुन्ह्याची उकल क्रमांक २ चे पारितोषिक गुन्हे शाखा २ वसई युनिटचे निरीक्षक शाहूराज रणवरे व पथकास देण्यात आले . नायगाव खाडीत वाहून जाणारा मृतदेह कमरुद्दीन अन्सारी ह्या गोरेगावच्या व्यक्तीचा असल्याची ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्यात शेजारी राहणाऱ्या पती - पत्नी आरोपीना पोलिसांनी वापी येथून अटक केली .
मध्यप्रदेश वरून गाडीने येऊन पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एटीएम केंद्रात गोंधळ घालून एकाची फसवणूक करणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला पेल्हार पोलिसांनी अटक केल्या प्रकरणी उत्कृष्ट गुन्ह्याची उकल क्रमांक ३ चे पारितोषिक वरिष्ठ निरीक्षक वसंत लब्दे याना देण्यात आले .
विरार भागात घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अक्रम अन्सारी ह्याला अटक करून १४ घरफोड्या उघडकीस आणणारे विरार गुन्हे शाखा ३ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख व पथकास विशेष रिवॉर्ड २ ने तर गटारावरील झाकणे , रिक्षा , गॅस सिलेंडर, दुचाकी व रोख अश्या विविध चोऱ्या करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला जेरबंद करणारे वळील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांना विशेष रिवॉर्ड ३ ने पोलीस आयुक्तांनी सन्मानित केले आहे .