भाईंदर शहरात आणखी एका रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी
By धीरज परब | Published: June 14, 2023 08:04 PM2023-06-14T20:04:35+5:302023-06-14T20:04:55+5:30
मेट्रो कारशेडसाठी डोंगरी येथील सरकारी जमीन संपादित करण्याच्या कामास लवकरच सुरवात केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
मीरारोड - भाईंदर येथील पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या जुन्या रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीस एमएमआरडीए आयुक्तांनी मंजुरी दिल्याचे तसेच मेट्रो कारशेडसाठी डोंगरी येथील सरकारी जमीन संपादित करण्याच्या कामास लवकरच सुरवात केली जाणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. बुधवारी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांच्या दालनात मीरा भाईंदर मेट्रो कामांसाह कारशेड, फुट ओवर ब्रिज आदि विविध विकास कामां बद्दल बैठक झाली. यावेळी आ. सरनाईक सह आमदार गीता जैन, एमएमआरडिएचे अघिकारी, शहर अभियंता दीपक खांबित, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, सचिन मांजरेकर आदी उपस्थित होते.
भाईंदर पूर्व - पश्चिम रेल्वे फाटक बंद झाल्याने त्याठिकाणी उड्डाण पूल बांधण्याची मागणी आ. सरनाईक यांनी केली होती. बैठकीत आयुक्तांनी कामाला मान्यता देत लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या कामासाठी जवळपास १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे भाईंदरला आणखी एक पूर्व - पश्चिम जोडणारा उड्डाणपूल झाल्यास सध्याच्या उड्डाणपुलावर होणारी कोंडी कमी होऊन नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे.
मीरा भाईंदर मेट्रोचे काम सुरु असताना होणाऱ्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांना, वाहन चालकांना त्रास होणार नाही, अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करून बॅरीगेट्स लावावेत, महामार्गा लगतचा खराब झालेला सर्व्हिस रस्ता दुरुस्त करावा असे सांगण्यात आले. मेट्रो उत्तन पर्यंत नेण्यासह डोंगरी येथील कारशेडच्या जागेचे भूसंपादन लवकरच सुरु करण्या बाबत चर्चा झाली . या कामांच्या निविदा काढून कामांना सुरवात करण्याची मागणी आमदारांनी केली. गायमुख ते काशीमीरा मेट्रो मार्गाची निविदा काढून कामास सुरवात करण्याची मागणी केली असता या मेट्रो मार्गाच्या कामाची निविदा लवकरच निघेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले असे आ. सरनाईक यांनी सांगितले.