निवडणूक काळात घेतली योग्यता चाचणी परीक्षा; मीरा-भाईंदर पालिकेकडे मागवला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 07:24 AM2024-05-09T07:24:13+5:302024-05-09T07:25:06+5:30
आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता चाचणी परीक्षा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : लोकसभा निवडणुकीच्या कामात एकीकडे अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याचे सांगून नागरिकांच्या तक्रारींवर टोलवाटोलवी करणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेने ऐन निवडणुकीच्या काळात योग्यता चाचणी परीक्षा घेतली. त्यावर आयोगाने पालिकेकडे खुलासा मागवला असता पालिकेने मात्र आचारसंहितेचा भंग नसल्याचे कळवले आहे.
अभियंत्यांना निवडणूक कामी नेमण्यात आले आहे. निवडणुकीचे काम आणि कार्यालयीन काम असताना दुसरीकडे महापालिकेने या ४६ कनिष्ठ अभियंत्यांची योग्यता चाचणी परीक्षा २६ एप्रिल रोजी घेतली. वास्तविक निवडणुकीचे काम असल्याने चाचणी परीक्षा नंतर घ्यावी, अशी विनंती अभियंत्यांनी केली होती. इतकेच काय, ते अनेकांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदींनादेखील पत्र दिले होते. परीक्षेसाठी अभ्यास करण्याकरिता तसेच निवडणूक आणि पालिका कामातून वेळ मिळावा, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली होती. कनिष्ठ अभियंत्यांच्या पत्रानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आयुक्तांना २२ एप्रिल रोजीच्या पत्रान्वये ॲटिट्यूड टेस्ट ४ जूननंतर घ्यावी म्हणून कळवले. परंतु, पालिकेने त्या पत्राला न जुमानता परीक्षा घेतली. आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेने निवडणूक आयोगाची परवानगी न घेता चाचणी परीक्षा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती.
महापालिकेने त्यांच्या अधिनस्त असलेल्या स्थायी वा अस्थायी कर्मचाऱ्यांची योग्यता चाचणी घेणे म्हणजे आचारसंहितेचा भंग होत नाही. हा पालिकेच्या कामकाजाचा हा भाग आहे. त्यामुळे आयोगालादेखील याबाबतचा अहवाल दिला असून आचारसंहिता भंग झाला नसल्याचे कळवले आहे.
- रवी पवार, उपायुक्त,
मीरा-भाईंदर महापालिका