‘त्या’ खलाशांच्या प्रतिकृतींवर अंत्यसंस्कार , ओखा बंदरातील दुर्घटना, बोटीच्या अवशेषातून सापडला राजेशचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 05:32 AM2017-09-16T05:32:03+5:302017-09-16T05:32:36+5:30
गुजरातच्या ओखा बंदरातील खोडीयाल माता या मच्छीमार बोटीला आॅगस्ट अखेरीस जलसमाधी मिळाली होती. बोटीतील दहापैकी पाच खलाशी वाचले मात्र उर्विरत खलाशांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यापैकी राजेश परशु ठाकरे याचा मृतदेह पंधरादिवसानी हाती लागला आहे.
डहाणू/बोर्डी : गुजरातच्या ओखा बंदरातील खोडीयाल माता या मच्छीमार बोटीला आॅगस्ट अखेरीस जलसमाधी मिळाली होती. बोटीतील दहापैकी पाच खलाशी वाचले मात्र उर्विरत खलाशांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यापैकी राजेश परशु ठाकरे याचा मृतदेह पंधरादिवसानी हाती लागला आहे. तर अन्य दोन खलाशाच्या कुटुंबीयांनी बेपत्ता खलाशांच्या प्रतिकृती बनवून अंत्यसंस्कार आटोपले.
या मासेमारी बोटीतील खलाशी बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या डहाणूतील कुटुंबीयांनी ओखा बंदरात जाऊन बोटमालकांकडे चौकशी केली. मात्र त्यात सुरक्षायंत्रणांनाही अपयश आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबीय निराश होऊन माघारी परतले होते. लोकमतने या बद्दल बातमी प्रसिद्ध केल्यानंतर डहाणूतील महसूल विभागाने पीडितांच्या घरी जाऊन पंचनाम्याद्वारे शासकीय दफ्तरात नोंदही केली. त्यानंतर नरपड व चिखले गावच्या दोन पीडित कुटुंबीयांनी बेपत्ता घरधान्याच्या परतीच्या आशा मावळल्याने त्यांची प्रतिकृती करून अंत्यसंस्कार पार पाडले.
दरम्यान जलसमाधी मिळालेल्या बोटींचे अवशेष समुद्रातून काढताना चिखले गावातील राजेश परसु ठाकरे या खलशाचा मृतदेह हाती लागला आहे. त्यामुळे अन्य चार खलाशांच्या मृतदेहाची शोधमोहीम तटरक्षक दल व गुजरात बंदर विभाग यांच्याकडून सुरु करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पालघर विधानसभेचे आमदार अमीत घोडा, यांनी मृतखलाशी राजेश ठाकरे यांच्या कुटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या वेळी शिवसेनेचे डहाणू तालुका प्रमुख संतोष वझे, शहर प्रमुख संजय कांबळे आदि उपस्थित होते.