मनपा आयुक्तांपेक्षा सहायक आयुक्त ठरत आहेत वरचढ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 11:57 PM2020-11-15T23:57:49+5:302020-11-15T23:58:04+5:30

आयुक्तांच्या बदली आदेशाला दाखवली केराची टोपली

Are Assistant Commissioners superior to Municipal Commissioners? | मनपा आयुक्तांपेक्षा सहायक आयुक्त ठरत आहेत वरचढ ?

मनपा आयुक्तांपेक्षा सहायक आयुक्त ठरत आहेत वरचढ ?

Next

मंगेश कराळे
n  लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेत पेल्हार विभागातील सहायक आयुक्तांची बदली झालेला आदेश मनपा आयुक्तांनी काढला, पण त्याला चक्क केराची टोपली दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे मनपा आयुक्तांपेक्षा सहायक आयुक्त वरचढ असल्याची चर्चा सध्या वसई तालुक्यात सुरू आहे.
वसई-विरार महापालिकेच्या अंतर्गत पेल्हार व धानीवच्या ‘एफ’ विभागातील सहायक आयुक्त नीता कोरे यांची बदली करण्यात आल्याचा आदेश आयुक्त गंगाथरन डी. यांनी ४ नोव्हेंबरला काढला. त्या जागी सहायक आयुक्त म्हणून सुरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली, पण त्यांना अद्यापपर्यंत पदभार मिळालेला नाही. नीता कोरे यांनी त्यांना कार्यभार देण्यास सपशेल नकार दिला असून बदली आदेशाला चक्क केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे. दरम्यान, बदली रद्द व्हावी म्हणून नीता कोरे यांनी प्रयत्न केले असल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.
मनपा आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले व ते मनपाच्या सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकले. ज्यांची बदली झाली त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यात्या विभागाचा पदभार स्वीकारला. पण, लेखी आदेश मिळाला नाही म्हणून ज्यांची नियुक्ती झाली त्या अधिकाऱ्याला पदभार दिला नसल्याची पहिलीच घटना वसई-विरार महापालिकेत घडली आहे. आयुक्त दिवाळीनिमित्त सुटीवर असून ते गावी गेलेले असल्याचेही सूत्रांकडून कळते. ते हजर झाल्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.


४ नोव्हेंबरला एफ विभागात सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्याचा आदेश व्हॉटस्ॲपद्वारे मिळाला होता. त्याच दिवशी मुख्यालयातून फोन आला की, सदर विभागासाठी दोन दिवसांसाठी कार्यभार स्वीकारू नये. ९ नोव्हेंबरला मुख्यालयातून एफ विभागाचा कार्यभार घेण्यास सांगितले. १० तारखेला सकाळी १० वाजता प्रभाग समिती ‘एफ’ कार्यालयात कार्यभार स्वीकारण्यासाठी गेल्यावर तेथील सहायक आयुक्त नीता कोरे यांनी सपशेल नकार दिला. याबाबत आयुक्तांना भेटून लेखी पत्राद्वारे तक्रार केलेली आहे. आयुक्त याबाबत निर्णय घेतील.    
    - सुरेंद्र पाटील, नियुक्ती केलेले सहायक आयुक्त

मला अद्यापपर्यंत लेखी ऑर्डर मिळाली नसून ती मिळाली पाहिजे. ज्या वेळी माझी नियुक्ती केली होती, तेव्हा मला लेखी ऑर्डर मिळाल्यावर मी ‘एफ’ प्रभागाचा पदभार स्वीकारला होता.    - नीता कोरे, 
सहायक आयुक्त, एफ विभाग

Web Title: Are Assistant Commissioners superior to Municipal Commissioners?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.