अर्नाळा किल्ला ते वसई सागरी जलतरण मोहीम संपन्न, जिया रायचा नवा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 05:54 PM2021-01-05T17:54:16+5:302021-01-05T17:57:57+5:30
Vasai News : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये ही पहिलीच जलतरण मोहीम आयोजित करण्यात आली होती.
वसई - वसई तालुका शिवसेनेने कळम्ब स्पोर्ट्स फाउंडेशन व शिवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व विजय पाटील फाउंडेशनच्या सौजन्याने अर्नाळा केला ते वसई किल्ला ह्या 22 किलोमीटर सागरी जलतरण मोहिमेला आज सकाळी 6.45 मिनिटांनी सुरुवात झाली. यावेळी तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर, जिल्हा सह सचिव विवेक पाटील यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी अर्नाळा किल्ल्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.
सकाळी थंडगार हवेत सुरू झालेल्या या सागरी जलतरण मोहिमेला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु नंतर मात्र भरती व ओहोटीमुळे जलतरणपटूंना थोडा त्रास झाला. विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी झालेल्या गतिमंद जिया राय या 14 वर्षाच्या मुलीने आपलाच 14 किलोमीटरचा पूर्वीचा विक्रम मोडीत काढून तिने आज जवळपास 25 किलोमीटरचे भले मोठे समुद्र अंतर पार केले. मंगळवारी संपन्न झालेल्या या जलतरण मोहिमेत राष्ट्रपतीपदक विजेता प्रभात कोळी याने 6 तास 3 सेकंद, कार्तिक गुगल 6 तास 11 मिनिटे, राकेश कदम 6 तास 43 मिनिटे,शार्दूल घरत 6 तास 48 मिनिटे आणि जिया राय हिने 7 तास वेळ घेतली.
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये ही पहिलीच जलतरण मोहीम आयोजित करण्यात आली होती या मोहीमचा समारोप दुपारी 2 वाजताच्या सुमारास वसई किल्ल्यात झाला. दरम्यान या कार्यक्रमाच्या समारोपाला माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण,पालघर जिल्हा सहसचिव विवेक पाटील, महाराष्ट्र जलतरण असो.चे सचिव किशोर शेट्टी उपाध्यक्ष डॉ.जयप्रकाश दुबले ,वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित शिवसेना शहर प्रमुख राजाराम बाबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय गुरव व प्रथमेश राऊत यांनी केले तर आभार विभाग प्रमुख शशीभूषण शर्मा यांनी मानले.